नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड गावात सिगारेट पाकिटाचे पैसे मागितल्याच्या कारणातून टोळक्याने पानस्टॉल चालकास बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली तर तीन साथीदार फरार आहे. याप्रकरणी शरद भगवंत बोडके (रा.नवनाथनगर,डीजीपीनगर २) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण आण्णा कडुस्कर (२९ रा. आनंद सागर अपा. इंडोलाईन फर्निचर मागे,अंबड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याचे तीन साथीदार पसार झाले आहेत. बोडके यांचे अंबड गावातील बस थांबा परिसरात विठ्ठल रूक्मिणी नावाचे पानस्टॉल आहे. सोमवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास बोडके आपला व्यवसाय सांभाळत असतांना संशयितासह त्याचे तीन साथीदार तेथे आले.
यावेळी टोळक्याने सिगारेटचे पाकिट घेतले मात्र पैसे दिले नाही. त्यामुळे बोडके यांनी पैशांची मागणी केल्याने ही घटना घडली. संतप्त संशयित टोळक्याने बोडके यांनी शिविगाळ करीत टपरी बाहेर ओढून दमदाटी व मारहाण केली. यावेळी टोळक्याने टपरीमधील चॉकलेटच्या बरण्या फेकून दिल्याने बोडके यांचे मोठे नुकसान झाले असून करण कडूस्कर यास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
शहरात वावर ठेवणा-या तडीपाराला अटक
तपोवनरोडवरील समर्थनगर टी पॉईट भागात शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारावर कारवाई केली आहे. नईम अब्बास शेख (३४ रा. भोई गल्ली,बागवानपुरा हल्ली स्प्रिंग व्हॅली, पोतदार शाळे समोर तपोवनरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नईम शेख याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास पोलिसांनी शहर आणि जिह्यातून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच युनिट १ च्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास तो समर्थनगर टी पॉईट भागात असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेत त्यास गजाआड केले. याबाबत युनिटचे अंलदार जगेश्वर बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक शेळके करीत आहेत.