नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात बरेक मधून बाहेर आल्याचा जाब विचारल्याने कैद्याने कारागृह कर्मचा-यांच्या अंगावर धावून हल्याचा करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. अन्य कर्मचा-यांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमर मारूती माळी असे संशयित बंदीचे नाव आहे. याप्रकरणी कारागृह कर्मचारी रूपेश आनंदा पवार (३० रा.जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार सोमवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास कारागृहातील सर्कल नं. सहा मध्ये नियमीत काम करीत असतांना संशयित तेथे आला. यावेळी पवार यांनी बराक बाहेर पडल्याबाबत जाब विचारला असता संशयिताने शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांच्या अंगावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अन्य कर्मचा-यांनी धाव घेत संशयित माळी याची रवानगी पुन्हा आपल्या बरेक मध्ये केल्याने मोठा अनर्थ टळला असून अधिक तपास उपनिरीक्षक मुन्तोडे करीत आहेत.
महिलेच्या गळयातील मंगळसूत्र बुलेटस्वारांनी ओरबाडून नेले
गंगापूररोड वरील आसाराम बापू ब्रिज भागात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र बुलेटस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिनाक्षी अनिल खैरणार (६५ रा.अथर्व कॉलनी,सावरकरनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
खैरणार मंगळवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. गंगापूररोडने त्या आसाराम बापू ब्रिजच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. एकांत बिल्डींग नजीकच्या सदाशांती बंगल्या समोरून त्या पायी जात असतांना बुलेटवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ७० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.