नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पांडवलेणी भागात किरकोळ कारणातून एका महिलेस बेदम मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. एकमेकांच्या शेजारी राहणा-या शेजा-यांचा वाद विकोपाला गेल्याने ही घटना घडली. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चार जणांविरूध्द विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी किसन बस्ते, नंदू किसन बस्ते, मनिषा रवी बस्ते व पायल नंदू बस्ते (रा.सर्व बस्ते मळा,पांडवलेणी पायथ्याशी) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित आणि पीडिता एकमेकांचे शेजारी असून, घराबाहेर पडलेली चप्पल तोडल्याच्या संशयातून हा वाद झाला. बुधवारी (दि.१९) पीडिता आपल्या घरात एकटी असतांना संशयितांनी चप्पल तोडल्याच्या संशयातून शिवीगाळ केली. यावेळी पीडित महिलेने समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी तिला मारहाण केली. तर दोघा भावांनी तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
जुगार खेळणारे दोघे गजाआड
जुगार खेळणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड करुन त्यांच्या ताब्यातून जुगाराच्या साहित्यासह रोकड असा ऐवज हस्तगत केला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन शामराव अटक (४१ रा.कालिका मंदिरामागे,मुंबईनाका) व विलास फकिरा जाधव (५१ रा.लक्ष्मणनगर,पेठरोड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पेठरोडवरील मेघराज बेकरी परिसरात उघड्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१९) पोलिसांनी धाव घेत छापा टाकला असता दोघे संशयित उघड्यावर एका झाडाच्या आडोश्याला लोकांकडून अंक आकड्यावर पैसे लावून घेत मिलन व टाईम बाजार नावाचा जुगार खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोकड असा सुमारे ६३० रूपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी शिपाई पंकज चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.