नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील आनंदवली शिवारात भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने ३३ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला.संदिप रंगनाथ पोटींद (रा. कोळीवाडा, गिरणारे ता.जि.नाशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोटींदे हे बुधवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास स्व:ताच्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. काळेनगर कडून गंगापूररोडने तो प्रवास करीत असतांना गुरूजी हॉस्पिटल परिसरातील एव्हरेस्ट स्क्वेअर अपार्टमेंट समोरील गुलमोहराच्या झाडावर भरधाव दुचाकी आदळली. या अपघातात संदिप गंभीर जखमी झाल्याने चुलत भाऊ गणेश पोटींद यांनी त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ.सुनिल मोरे यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी हवालदार चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
दोघांची एकास बेदम मारहाण
जयभवानीरोड भागात पोलिसांचा खब-या असल्याच्या संशयातून दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी बॅटचा वापर करण्यात आल्याने तरुण जखमी झाला असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पासर नंदन सिंग व रोशन नरेंद्र पवार अशी संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी धीरज प्रकाश मसुरे (१९ रा.हरिद्वार सोसा.कदम दुध डेअरी समोर,जयभवानीरोड) याने तक्रार दाखल केली आहे. मसुरे बुधवारी (दि.५) सायंकाळी कदम डेअरीजवळून जात असतांना दोघा संशयितांनी त्यास गाठले यावेळी तू आमच्या बद्दल पोलिसांना खोटे सांगतो या कारणातून कुरापत काढून दोघांनी त्यास लाकडी बॅटने बेदम मारहाण केली. या घटनेत मसुरे जखमी झाला असून अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत.