नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हॉटेलमध्ये बेकायदा चालणारा हुक्का पार्लरचा अड्डा पोलिसांनी उदध्वस्त केला. आडगाव म्हसरूळ रोडवर हे हॉटेल आहे. याप्रकरणी हॉटेलमालकासह व्यवस्थापकाविरूध्द म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ संजय देशमुख (३२ रा.देशमुख वस्ती,म्हसरूळ) व सुरेन्दर प्रेमासिंग धामी (२३ रा. हॉटेल कॅटल हाऊस, आडगाव म्हसरूळ लिंकरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
या कारवाईत वेगवेगळ्या फ्लेवरचा सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ व हुक्का पिण्याचे साहित्य असा सुमारे १८ हजार २३० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, संशयितांपैकी देशमुख हे हॉटेल मालक तर धामी व्यवस्थापक आहेत. आडगाव म्हसरूळ रोडवरील देशमुख वस्ती भागात हॉटेल कॅटल हाऊस येथे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.१५) रात्री पोलिसांनी छापा टाकला असता हॉटेलमध्ये ग्राहक हुक्का ओढतांना मिळून आले.
संशयितांनी बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूसह साहित्य उपलब्ध करून दिल्याचे समोर आल्याने पोलिसांनी सुमारे १८ हजार २३० रूपये किमतीचा मु्द्देमाल जप्त केला असून याप्रकरणी अंमलदार पंकज चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.