नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया कारवाईत गांजा विक्रेत्यासह वाहतूकदारास पोलिसांनी गजाआड केले आहे. या आरोपींकडून ८० हजार रूपये किमतीचा अमलीपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सातपूर आणि म्हसरूळ पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातपूर गावातील मच्छीबाजार भागात गांजाची विक्री होत असल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी (दि.१३) रात्री पथकाने सापळा लावला असता सचिन रमेश लोखंडे (३५ रा.जेपीनगर,सातपूर) हा गांजा विक्रेता पोलिसांच्या जाळ््यात अडकला. संशयित खोका मार्केट भागात गाजांची विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे २० हजार ४० रूपये किमतीचा मादक पदार्थ हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी उपनिरीक्षक बाळू वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पठाण करीत आहेत. दुसरी कारवाई पेठरोड भागात करण्यात आली.
मालेगाव पासिंग मालट्रकमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१४) नायरा पेट्रोल पंपासमोर पथकाने सापळा लावला होता. पेठ कडून नाशिकच्या दिशेने येणारा मालट्रक एमएच ४१ एयू ५९९५ अडवून पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकच्या कॅबीनममध्ये हिरवट काळपट रंगाचे पाने फुले काड्या बिया अश्या गांजा सदृष्य कॅनबिस वनस्पती आढळून आली. याकारवाईत चालक लाला मेहमूद शहा (४८ रा.सून्नी दर्गा जवळ,मालेगाव) यास अटक करीत पोलिसांनी सुमारे ५७ हजार ७०० रूपये किमतीचा गांजा सदृष्य वनस्पती हस्तगत केली असून याप्रकरणी जमादार रंजन बेडाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नागरे करीत आहेत.