नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर औद्योगिक वसाहतीतील डिझायनर कारखाना भागात धावत्या ट्रकमधून पडल्याने एकाचा मृत्यू झाला. नवनाथ प्रभाकर मोंढे (३६ रा.आशेवाडी ता. दिंडोरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोंढे हे सोमवारी (दि.१२) एमएच १५ एचएच ३६३६ हा बारा चाकी मालट्रक खाली करण्यासाठी सातपूर औद्योगिक वसाहतीतील डिझायनर कंपनीत गेले होते. कंपनीचा मालखाली करून ते मालट्रकने परतत असतांना ही घटना घडली. कंपनीपासून काही अंतरावरच चालक कॅबीनमध्ये क्लिनर साईडला बसलेले मोंढे अचानक जमिनीवर कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागला. टॅकमध्ये त्यांच्यासोबत असलेल्या दत्तू चारोस्कर यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक गावीत करीत आहेत.
जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई
जुगार खेळणा-या चार जुगारींवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंजमाळ परिसरातील घासबाजार भागात काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सलीम अब्दूल रहेमान पठाण (रा.पिंपळचौक,ठाकरे गल्ली),नवाज शेरू पठाण (रा.भिमवाडी,भद्रकाली),दिनेश दयाराम यादव (रा.भद्रकाली) व समिर विजय यादव (रा.रमाबाई आंबेडकरनगर,खडकाळी) अशी संशयित जुगारीची नावे आहेत.
सोमवारी पथकाने छापा टाकला असता संशयित पत्यांच्या कॅटवर अंदरबाहर जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार धनंजय हासे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक कोळी करीत आहेत.