नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही सुख सुविधा न पुरविल्याचा ठपका ठेवत बांधकाम ठेकेदार व त्याच्या साथीदारांविरूध्द गंगापूर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सादीक अब्बास शेख (रा.अजमेरी अ ९ आनंदविहार रो हाऊस,संजीवणी हॉस्पिटल जवळ शिवाजीनगर)व अन्य जबाबदार व्यक्ती अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी चेतन राजेंद्र शेळके (रा. राधाकृष्णनगर, श्रमिकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेत बाळू शिवराम शेळके (५५ रा. हिंदी शाळेजवळ, श्रमिकनगर) यांचा मृत्यू झाला.
शेळके गेल्या शनिवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास शिवाजीनगर येथील मस्जीद समोरील सहज ब्लॉसम स्कूल अॅण्ड ज्यु.कॉलेज या शाळेच्या बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. संशयित ठेकेदार व त्याच्या साथीदारांनी बांधकाम कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुखसुविधा न पुरवता त्यांना पहिल्या मजल्यावरील बिम भरण्याचे काम सांगितले होते. बिम भरण्याचे काम सुरू असतांना अचानक तोल गेल्याने ते इमारतीखाली कोसळले होते. पहिल्या मजल्यावरून पडल्याने त्यांच्या डोक्यास वर्मी मार लागला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत.