नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील सावतानगर भागात पत्नीस घेण्यासाठी सासरी आलेल्या मेव्हण्यावर शालकाने खूनी हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत तरूणाने काही तरी हत्याराने वार केल्याने जावई गंभीर जखमी झाला आहे. या मारहणीप्रकरणी संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन कैलास बचाटे (रा.सावतानगर,सिडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी विदेश उर्फ अजय भाऊसाहेब बागुल (२३ रा.कोरडगाव ता.वैजापूर संभाजीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बागुल यांची पत्नी आपल्या माहेरी निघून आल्याने ते गेल्या बुधवारी (दि.२४) तिला घेण्यासाठी सिडको भागात आले होते.
सुभाष चंद्र बोस गार्डन भागात पत्नीस भेटून सोबत यावे याबाबत तिला समजून सांगत असतांना संशयिताने हा हल्ला केला. जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयिताने बागुल यांच्यावर काही तरी धारदार हत्याराने त्यांच्यावर वार केले. या घटनेत बागुल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जबाबावरून हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले असून, अधिक तपास उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.