नाशिक – लहान मुलांमध्ये बॅक्टेरियल न्यूमोनियाचा धोका अधिक असतो. त्यामुळे चिमुकल्यांना जीव देखील गमवावा लागू शकतो. या प्रकारे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आता न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीचा सार्वत्रिक नियमित लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.
देशात एक हजार मुलांमागे ३४ मुले न्यूमोनियामुळे मृत्यू पावतात. राज्यात त्याचे प्रमाण एक हजार मुलांमागे १९ आहे. या बचावासाठी उद्या दि १३ जुलै पासून न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. बॅक्टेरियल न्यूमोनिया पासून बालकांमधील मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे.
बॅक्टेरियल न्यूमोनिया हा आजार प्रामुख्याने वयोवृद्धांसोबातच बालकांमध्येही आढळतो. हिप न्यूमोनिया आणि बॅक्टेरियल न्यूमोनियामुळे साधारणतः अर्भक आणि बालमृत्यू होतात. बालकांमधील मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी राज्यभरात बालकांमधील लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट हि लस प्रभावी ठरत आहे.
या लसीकरण मोहीमेअंतर्गत दीड महिन्यांच्या नवजात शिशुला पहिला डोस दिला जाणार आहे. त्यानंतर साडेतीन महिन्यानंतर दुसरा आणि ९ महिन्यानंतर तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे.सदर लसीकरण हे दीड महिन्यांच्या नवजात बालकांपासून सुरुवात केली जाणार आहे.शहरातील सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियमित लसीकरण सत्रात ही लस दिली जाणार आहे. न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीकरणाच्या अनुषंगाने आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे.