नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील गुन्हेगारीवर आळा बसावा किंबहुना गुन्ह्यांचे प्रमाण अतिअल्प व्हावे म्हणून अवघे शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत असावेत यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना आता यश आले.गोडसे यांच्या सततच्या पाठपुरामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या मूलभूत सुविधांचा विकास योजनेतून 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या निधीतून अवघ्या शहरात शेकडो सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.तर काही ठिकाणी इतर विकास कामे करण्यात येणार आहेत.शहरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याने शहरवासियांची सुरक्षा मजबूत होणार असून गुन्हेगारांवर निश्चितच मोठ्या प्रमाणावर आळा बसेल अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरात चोऱ्या,घरफोड्या,चैन स्नॅचिग,टवाळखोरांकडून वाहणांची तोडफोड,मद्यपींकडून सतत होणारी गुंडागर्दी,शहरात वेगाने वाहन चालविणाऱ्या मद्यपंकडून सतत होणारे अपघात आदी गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे.पोलीस प्रशासन जरी आपले कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पडत असले तरी शहराची वाढत्या व्याप्तीमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. शहरात सीसीटीव्हीची संख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने चोरटे आणि गुन्हेगारांचे चांगलेच फावते.सक्षम पुरावा हाती येत नसल्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे अवघड होत असते.यातूनच शहरभर सीसीटीव्ही असावेत अशी मागणी सातत्याने शहरातील विविध संस्थांकडून आणि शहवासियांकडून खासदार गोडसे यांच्याकडे होत होती.
शहरवासीयांकडून सुरक्षेविषयी आलेल्या मागणीची गंभीर दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांनी शहरभर सीसीटिव्ही बसविण्याकामी निधी मिळावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीतही खासदार गोडसे यांनी सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा विषय मुख्यमंत्र्यांकडे काढला होता.सीसी शहरातील गुन्हेगारीवर निश्चितच आळा बसू शकेल त्यामुळे तातडीने सीसीटीव्हींसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याची गळ गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांना घातली होती.
खासदार गोडसे यांची शहराच्या सुरक्षा विषयी असलेली तळमळ पाहून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत शहरात सीसीटीव्ही यांचा बसविण्यासाठी पंधरा कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.या निधीतून शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून काही विकासकामेही करण्यात येणार आहे.या सीसीटीव्हीमुळे पोलीस प्रशासनाचाही कामाचा भार काही अंशी कमी होणारा असून शहराची सुरक्षा मजबूत होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.सीसीटीव्हीमुळे आता अवघ्या शहरावर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे.
सीसीटीव्ही बरोबरच जुने सायड्रिक इंडिया कंपनी ते पंचक चौक दरम्यानचा रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक २४ मधील शिवालय कॉलनी येथील महानगरपालिका ओपन स्पेस चे सुशोभीकरण करणे व रस्ता बांधणे,प्रभाग क्रमांक २७ मधील श्रीकृष्ण नगर येथील ओपन स्पेस येथे सांस्कृतिक भवन बांधणे, प्रभाग क्रमांक ३१ मधील अंबड गावातील मारुती मंदिर सर्व सभामंडप बांधणे,प्रभाग क्रमांक दोन मधील नांदूर गावाजवळील मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे ,प्रभाग क्रमांक दोन मधील मानूर गावातील मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे, प्रभाग क्रमांक २७ मधील राजे संभाजी स्टेडियमचे विद्युतीकरण व सुशोभीकरण करणे ,प्रभाग क्रमांक २७ मधील मीनाताई ठाकरे उद्यान अश्विन नगर येथे महिलांसाठी अभ्यासिका बांधणे, सिंहस्थ नगर परिसराचे सुशोभीकरण करणे, प्रभाग क्रमांक ३१ मधील चेतना नगर महापालिका ओपन स्पेस येथे सामाजिक सभागृह बांधणे व सुशोभीकरण करणे या विकास कामांसाठी प्रत्येकी पन्नास लाखांच्या निधीला तर प्रभाग क्रमांक तीन मधील महानगरपालिका ओपन स्पेसवर अभ्यासिका बांधणे ,प्रभाग क्रमांक एक मधील सुशोभीकरण करणे या प्रत्येक कामांसाठी तीस लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे.
Nashik City CCTV 15 Crore Fund Sanction