विशेष प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेत सत्तेमध्ये असलेल्या भाजपने आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहर बससेवेचा श्रीगणेशा केला जाणार आहे. या सेवेचा मुहुर्त निश्चित करण्यात आला आहे. येत्या ८ जुलै रोजी नाशिककरांच्या सेवेत बससेवा रुजू होणार आहे. या सेवेचा शुभारंभ राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तपोवन आणि नाशिक रोड येथील डेपोचे काम पूर्णत्वाकडे आहे. बसेस सुरू करण्याच्या दृष्टीने ट्रायल रन (रंगीत तालिम) यशस्वी झाली आहे. मनपाच्या वतीने पहिल्या टप्प्यात ५० बसेस सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या ८ जुलैपासून नाशिककरांना ही सेवा मिळणार आहे.
बससेवेचे मार्ग असे
१) तपोवन ते बारदान फाटा मार्गे सिव्हील, सातपूर, अशोकनगर श्रमिकनगर
२) तपोवन, सिम्बायोसिस कॉलेज मार्गे पवन नगर, उत्तम नगर
३) तपोवन ते पाथर्डी गाव मार्गे द्वारका नागजी, इंदिरानगर, वनवैभव
४) सिम्बायोसिस कॉलेज ते बोरगड मार्गे शिवाजी चौक, लेखा नगर, महामार्ग, म्हसरूळ, बोरगड.
५) तपोवन ते भगूर मार्गे शालिमार, द्वारका बिटको, देवळाली कॅम्प
६) नाशिकरोड ते बारदान फाटा मार्गे द्वारका कॉलेज रोड, सातपूर, व्हीआयपी, कार्बन नाका
७)नाशिक रोड ते अंबड गाव मार्गे द्वारका, महामार्ग, लेखानगर, गरवारे
८) नाशिक रोड ते निमाणी मार्गे जेल रोड टाकी, सैलानी बाबा, नांदूर गाव, नांदूर नाका, तपोवन
९) नाशिक रोड ते तपोवन मार्गे बिटको, द्वारका, शालिमार, सीबीएस, पंचवटी
या ९ मार्गावर २४० बस थांबे असणार आहेत. जुलै २०२१ च्या पहिल्या आठवड्या पासून ही बस सेवा सुरू करण्याच्या विचाराधीन असून याबाबतच्या कामकाजाचा २५ जून रोजी सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. या बसेस साठी नियुक्त होणारे कंडक्टर व ड्रायव्हर त्याबाबतचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसात उर्वरित लोकांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील नियोजन
सिटी बसच्या अहवालानुसार हाय पेयींग रूटवर या बस धावणार आहेत. भविष्यात शहर बस बरोबरच ओझर विमानतळ, त्र्यंबकेश्वर, कसारा लोकलला जोडणारी बस सेवा सुरू करण्याचा नियोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर नाशिक दर्शन सारखे पर्यटन स्थळांवर व सुला वाईन, बोट क्लब इत्यादी ठिकाणी लवकरच रूट तयार करून बस सुरू करण्याचा विचार आहे.
शॉपिंग मॉल
नाशिक महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने तपोवन व नाशिकरोड डेपोच्या आवारात शॉपिंग मॉल उभारण्याचेही महापालिकेच्या विचाराधीन आहे.