नाशिक – नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व महानगरपलिके अंतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन असणाऱ्या २५० बसेस शहरातील नागरीकांच्या सेवेसाठी टप्या टप्याने लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा अधिकारी भरत कळसकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात शहर बस सेवेसाठी मे.ट्रॅव्हेल टाइम कार रेन्टल प्रा.लि.पुणे यांच्यामार्फत १२० सी.एन.जी बसेस व मे सिटी लाइफ ट्रॅव्हेल्स प्रा.लि. दिल्ली यांच्यामार्फत २० डिझेल व ८० सी.एन.जी. पर्यावरणपुरक बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. या दोन्ही कंपनी मार्फत ऑपरेटर्सची नेमणूक करण्यात आली असून, बस ऑपरेटर सोबत बसची खरेदी, व्यवस्थापन, संचालन व देखभालीसाठी १० वर्षाचा करारनामा करण्यात आला आहे.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ यांनी नाशिक शहर व परिसरात एकूण २५० बसेसद्वारे शहर बससेवा चालू करण्यासाठी १४६ विविध मार्गावर टप्पा वाहतूकीस परवाना मिळणेसाठी, जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील त्रिस्तरीय समितीच्या परिचलन पध्दतीने शहरात महानगरपलिका हद्दीत व या हद्दीच्या पलिकडील २० किलो मीटर परिसरात १४६ मार्गावार वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
बससेवेसाठी किमान व कमाल दरांच्या अनुषंगाने १ ते २ कि.मी. पर्यंत १० रुपये पूर्ण तिकीट आणि ५ रुपये अर्धे तिकीट असेल. तसेच कमाल २ किलोमीटर ते ५० कि.मी. पर्यंतच्या टप्प्यास ६५ रुपये पूर्ण तिकीट आणि ३५ रुपये अर्धे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक शहर परिवहन बससेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे पर्यावरणपुरक इंधन असलेल्या व कमीत कमी दरात प्रवासाची जलद सार्वजनिक बससेवेची सुविधा नाशिक शहरातील जनतेसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा अधिकारी कळसकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.