विशेष प्रतिनिधी, नाशिक
महानगरपालिकेच्यावतीने येत्या जुलै महिन्यात शहर बससेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. याष्टीने नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली. बांधकाम, गॅस, पुरवठा, मोबाईल ॲप याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने ९० टक्के काम पूर्ण होत आले आहे. तपोवन आणि नाशिक रोड येथील डेपोचे काम पूर्णत्वाकडे आहे.२७ जून ते ३० जून या दरम्यान बसेस सुरू करण्याच्या दृष्टीने ट्रायल घेण्यात येणार आहे. मनपाच्या वतीने पहिल्या टप्प्यात ५० बसेस सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
हे असणार मार्ग
१) तपोवन ते बारदान फाटा मार्गे सिव्हील, सातपूर, अशोकनगर श्रमिकनगर
२) तपोवन, सिम्बायोसिस कॉलेज मार्गे पवन नगर, उत्तम नगर
३) तपोवन ते पाथर्डी गाव मार्गे द्वारका नागजी, इंदिरानगर, वनवैभव
४) सिम्बायोसिस कॉलेज ते बोरगड मार्गे शिवाजी चौक, लेखा नगर, महामार्ग, म्हसरूळ, बोरगड.
५) तपोवन ते भगूर मार्गे शालिमार, द्वारका बिटको, देवळाली कॅम्प
६) नाशिकरोड ते बारदान फाटा मार्गे द्वारका कॉलेज रोड, सातपूर, व्हीआयपी, कार्बन नाका
७)नाशिक रोड ते अंबड गाव मार्गे द्वारका, महामार्ग, लेखानगर, गरवारे
८) नाशिक रोड ते निमाणी मार्गे जेल रोड टाकी, सैलानी बाबा, नांदूर गाव, नांदूर नाका, तपोवन
९) नाशिक रोड ते तपोवन मार्गे बिटको, द्वारका, शालिमार, सीबीएस, पंचवटी
या ९ मार्गावर २४० बस थांबे असणार आहेत. जुलै २०२१ च्या पहिल्या आठवड्या पासून ही बस सेवा सुरू करण्याच्या विचाराधीन असून याबाबतच्या कामकाजाचा २५ जून रोजी सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. या बसेस साठी नियुक्त होणारे कंडक्टर व ड्रायव्हर त्याबाबतचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसात उर्वरित लोकांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात हे नियोजन
सिटी बसच्या अहवालानुसार हाय पेयींग रूटवर या बस धावणार आहेत. भविष्यात शहर बस बरोबरच ओझर विमानतळ, त्र्यंबकेश्वर, कसारा लोकलला जोडणारी बस सेवा सुरू करण्याचा नियोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर नाशिक दर्शन सारखे पर्यटन स्थळांवर व सुला वाईन, बोट क्लब इत्यादी ठिकाणी लवकरच रूट तयार करून बस सुरू करण्याचा विचार आहे.
शॉपिंग मॉल उभारणार
नाशिक महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने तपोवन व नाशिकरोड डेपोच्या आवारात शॉपिंग मॉल उभारण्याची योजना विचाराधीन असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले आहे.
बससेवे संदर्भात झालेल्या आढावा बैठकीस मा.शहर अभियंता संजय घुगे,कार्यकारी अभियंता एस.एम चव्हाणके, कार्यकारी उदय धर्माधिकारी, बाजीराव माळी मिलिंद बंड, वसंत गायधनी,रणजीत ढाकणे आदी उपस्थित होते.