नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर बस वाहतूक करणाऱ्या सिटीलिंकने दिव्यांग व्यक्तींबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मोफत प्रवासाचे कार्ड नसलेल्या सर्व दिव्यांगांना आता तिकीटामध्ये पूर्वीप्रमाणे ७५ टक्के सवलत मिळणार आहे. उद्यापासून म्हणजेच, १ डिसेंबर पासून या नवीन निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने नाशिक महानगर पालिका हद्दीत राहणार्या दिव्यांग प्रवाश्यांसाठी मोफत प्रवासाची
योजना तयार करण्यात आली. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सिटीलिंक कार्यालयात जमा केल्यानंतर दिव्यांग प्रवाशांना मोफत कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र या योजनेचा नाशिक महानगर पालिका हद्दीबाहेर राहणार्या प्रवाश्यांना कोणताही लाभ घेता येत नव्हता. शहराबाहेरील दिव्यांग प्रवाशांची होणारी गैरसोय व वारंवार होणारी मागणीची दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार, नाशिक महानगर पालिका हद्दीतील असो वा हद्दीबाहेरील दिव्यांग प्रवासी असो ज्यांचेकडे मोफत कार्ड नाही अश्या प्रवाश्यांना आता तिकीटामध्ये पूर्वीप्रमाणे ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाने घेतला आहे.
१ डिसेंबर २०२२ पासून या नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परंतु दिव्यांग प्रवाशांना आधारकार्ड व शासनाचे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र प्रवासावेळी सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे. तसेच दिव्यांगाचे अपंगत्व हे ६५ टक्के पेक्षा जास्त असल्यास अश्या दिव्यांग प्रवाश्यासोबत असलेल्या साथीदार प्रवाशास देखील तिकीटामध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच सिटीलिंक मार्फत मोफत कार्ड दिलेल्या दिव्यांग प्रवाशांना प्रवास करतेवेळी वाहकाकडुन शून्य मूल्याचे तिकीट घेणे अनिवार्य असणार आहे. असे तिकीट न घेतल्यास असा प्रवासी विना तिकीट प्रवासी समजून कारवाई करण्यात येईल. तर मोफत कार्ड नसलेल्या दिव्यांग प्रवाश्यांनी १/४ मूल्याचे तिकीट वाहकाकडून घ्यावयाचे आहे. अन्यथा सदर प्रवासी विनाटिकीट प्रवासी समजून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
Nashik City Bus Service Decision for Outside Passengers
Citilinc Transport Divyaang Disable