नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या सिटीलिंक या शहर बससेवेचा दिवसेंदिवस विस्तार करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुविधांसाठी सिटीलिंकद्वारे विविध प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता दोन मार्गांवर जलद सेवा सुरू झाली आहे. प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊनच ही सेवा दिली जात असल्याने त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
निमाणी ते सिन्नर आणि सीबीएस ते पिंपळगाव अशा या दोन सेवा आहेत. सिन्नरहून सकाळी ९ वाजता आणि निमाणीहून सायंकाळी साडेसहा वाजता ही जलद सेवा दिली जात आहे. तसेच, पिंपळगावहून सकाळी ९.१५ वाजता आणि सीबीएसहून सायंकाळी ६.१५ वाजता ही सेवा सुरू झाली आहे. या दोन्ही सेवांना प्रतिसाद लाभत आहे. यापुढील काळातही अशाच प्रकारे जलद सेवांचा विस्तार करण्याचा सिटीलिंक प्रशासनाचा मनोदय आहे. सिटीलिंकने महिलांसाठी स्वतंत्र सेवा नुकतीच सुरू केली आहे. तसेच, प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार, इंदिरानगर-गोविंदनगर-कॉलेजरोड अशी चक्रीबससेवाही सुरू केली आहे. या सर्वच सेवांना नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद आहे.
https://twitter.com/CitilincNashik/status/1521099193657438209?s=20&t=ihkKpY60ioousif8Hh18SQ