नाशिक – नाशिककरांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे, शहरात काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेली सिटीलिंक ही शहर बससेवा अल्पावधीतच हीट ठरली आहे. त्यामुळे ही बाब नाशिक महापालिकेसह सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाची आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मुख्य कणा म्हणून शहर बससेवा नावारुपाला येत आहे. यापूर्वी ही सेवा एसटी महामंडळाकडून दिली जात होती. त्यानंतर ही सेवा काही वर्षे बंद पडली. आता सुरू होताच ती झपाट्याने वाढताना दिसत आहे.
नाशिक शहर बससेवेचा लाभ आतापर्यंत ५० हजाराहून अधिक प्रवाशांनी घेतला आहे. सद्यस्थितीत १०३ बसद्वारे शहरातील विविध मार्गांवर सेवा दिली जात आहे. या सेवेद्वारे दिवसाकाठी ७ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न महापालिकेला मिळत आहे. खास बाब म्हणजे, प्रति किलोमीटर या बससेवेद्वारे ३५ ते ४० रुपयांचा महसूल प्राप्त होत आहे. हा महसूल पुणे शहर बससेवा, ठाणे शहर बससेवा, नागपूर शहर बससेवा, औरंगाबाद शहर बससेवा यांच्यापेक्षा अधिक आहे. नाशिक शहर बससेवेचे तीन मार्ग हे सर्वाधिक नफा देणारे ठरले आहेत. ते म्हणजे निमाणी ते नाशिकरोड, निमाणी ते पवननगर आणि निमाणी ते बारदान फाटा. या तिन्ही मार्गांवर महापालिकेला प्रति किलोमीटर ८० रुपयांहून अधिक महसूल प्राप्त होत आहे. त्यामुळे शहर बससेवेवर शंका घेणाऱ्यांना सणसणीत चपराक मिळाली आहे. तसेच, येत्या काळात बसची संख्या वाढल्यानंतर फेऱ्या, मार्ग आणि महसूलातही लक्षणीय वाढ होणार आहे.