नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात बससेवा देणाऱ्या सिटीलिंकच्या वाहकांनी प्रलंबित मागण्यासाठी अचानक काम बंदचे हत्यार उपासले. त्यामुळे आज शहराच्या काही भागात बससेवा विस्कळीत झाली. त्याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. काही तासांनी सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे.
शहरात सिटी लिंकची बस सेवा सुरु असून नागरिकांचाही त्यास प्रतिसाद मिळतो आहे. कंत्राटी पद्धतीने वाहक अन चालकांमार्फत बससेवा दिली जात आहे. शहरात सुरु असलेली बससेवा आसपासच्या खेड्यांपर्यंतही वाढविण्यात आली आहे. तपोवन स्थानकातील ४१ वाहकांनी अचानक काम बंदचे हत्यार उपसले. मासिक वेतन थकले असून दिवाळीचा बोनसही मिळालेला नाही. कामबंद आंदोलन करण्यामागे हे प्रमुख कारण होते. कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी महापालिकेकडून संबंधित ठेकेदाराला निधी दिला जात असतानाही कर्मचायांचे वेतन राखडल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, इएसआय तसेच अन्य देणी सरकारकडे जमा केल्याच्या पावत्या न मिळाल्याने ऑक्टोबरचे वेतन रखडले आहे, असे सिटीलिंकचे उपमहाव्यवस्थापक मिलिंद बंड यांचे म्हणणे आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या आंदोलनांमुळे प्रवाशांची गैरसोय झाली. २१ बस फेऱ्या बंद कराव्या लागल्याने सेवा विस्कळीत झाली होती. दुसरीकडे नाशिकरॊड बस स्थानकातून मात्र सेवा सुरु आहे.
Nashik City Bus Employee Strike Service Disturb