नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर बससेवा (सिटीलिंक) च्या कंडक्टर्सला (वाहक) नाशिक महानगर परिवहन महामंडळाने चांगलाच दणका दिला आहे. विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १५१ वाहकांकडून तब्बल ५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) संचालक मंडळाची आज बैठक पार पडली. त्यात विविध निर्णयही घेण्यात आले आहेत.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. ( सिटीलिंक) च्या माध्यमातून दि. 8 जुलै 2021 रोजी नाशिककरांसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. नाशिककर प्रवाशांच्या सुखकर, आरामदायी व सुरक्षित प्रवासासाठी सिटीलिंक नेहमीच कटिबद्ध असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
सद्यस्थितीत सिटीलिंकच्या माध्यमातून एकूण 196 बसेस रस्त्यावर धावत आहे. यासाठी एकूण 592 वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान प्रवास करत असतांना प्रवासी अथवा वाहक यांचेकडून नियमांचे उल्लंघन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी विविध मार्गांवर एकूण 35 तपासणी कर्मचारी सिटीलिंकच्या वतीने नेमण्यात आले आहे. या मार्ग तपासणी कर्मचाऱ्यांवर एकूण 7,00,000/- रुपये मासिक खर्च सिटीलिंक करीत आहे. म्हणजेच वर्षाला 84 लाख रुपये खर्च होतो मात्र दंडात्मक रक्कम नगण्य वसूल होत असल्याचे निदर्शनास आले.
जुलै 2021 पासून ते एप्रिल 2022 पर्यंत सदर 35 तपासणी कर्मचाऱ्यांमार्फत एकूण 72133 फेऱ्या तपासण्यात आल्या. त्यात 871 विना तिकीट प्रवासी केसेस आढळून आल्या आहेत. त्यापोटी प्रवाशांकडून 3,05,787/- रूपये दंड म्हणून वसूल करण्यात आला आहे. तसेच या कालावधीत एकूण 151 वाहकांकडून या त्रुटी बददल 5,00,000/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवाशांकडून तिकीटाचे पैसे घेणे, परंतू तिकीट न देणे, प्रवाशांकडून तिकीटांचे पैसे घेणे परंतु कमी किंमतीचे तिकिट देणे किंवा विना तिकीट प्रवास करू देण्याची मूभा देणे अशा प्रकारच्या त्रुटी वाहकाकडून झाल्याच्या आढळल्या आहेत.
सिटीलिंकचे काम सुरळीत, पारदर्शकरित्या चालविण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहकांवर सिटीलिंकच्या वतीने दंडात्मक कारवाई, कामावरून काढून टाकण्याची कारवाई करण्यात येते. परंतू आता ही कारवाई अधिक कठोररित्या राबविण्याचे आजच्या बोर्ड मिटींगमध्ये ठरविण्यात आले आहे. यापुढे कोणत्याही वाहकाने आर्थिक अफरातफर केल्यास सदर वाहकाला नोकरीतून काढण्यात येईल. तसेच, त्याच्यावर भारतीय दंड संहितेनुसार पोलिस स्टेशन मध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. त्याशिवाय सदर वाहकाचा फोटो तसेच केलेला गुन्हा याबाबतची माहिती वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही प्रवाशाने विना तिकिट प्रवास केल्याचे आढळून आल्यास सदर प्रवाशावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच सदर प्रवाशाचा देखील फोटो आणि केलेला गुन्हा याबाबतची माहिती वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे.
सिटीलिंक बोर्डाच्या या निर्णयामुळे वाहक व प्रवासी दोघांमध्ये शिस्त येईल. त्यामुळे तपासणी कर्मचाऱ्यांवर वार्षिक एक कोटी रुपये खर्च होतो तो कमी करता येईल. बोर्डाने असाही निर्णय घेतला की, दंडात्मक रक्कमेतूनच तपासणी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होणेसाठी उपाययोजना कराव्यात.