नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ला सुरुवात झाली आहे. त्याची दखल नाशिक महापालिकेने घेतली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सिटीलिंक या सिटीबस पास केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ ला सुरुवात झाली आहे. परिणामी विद्यार्थ्यांची पास काढण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आता नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंक ने देखील पास केंद्रांच्या संख्येत वाढ केली आहे. विद्यार्थांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यानंतर पासेसची संख्या कमी झाल्याने सिटीलिंकच्या वतीने पास केंद्रांची संख्या देखील मर्यादित करण्यात आली होती. परंतु आता वाढणारी विद्यार्थी संख्या लक्षात घेता आता पुन्हा एकदा पास केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे.
त्यानुसार सद्यस्थितीत एकूण ६ पास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. खालीलप्रमाणे –
१) के.टी.एच.एम – याठिकाणी एक पास केंद्र सुरू करण्यात आले आहे. ( वेळ – सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत )
२) निमाणी – याठिकाणी पूर्वी १ पास केंद्र सुरू होते त्यात आता आणखी एक पास केंद्राची संख्या वाढविण्यात आल्याने निमाणी येथे सद्यस्थित दोन पास केंद्र सुरू आहेत. (वेळ – सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत )
३) नाशिकरोड– याठिकाणी १ पास केंद्र सुरू आहे. ( वेळ – सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत )
४) सिटीलिंक मुख्यालय– याठिकाणी ३ पास केंद्र सुरू आहेत. ( वेळ – सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत )
सद्यस्थितीत एकूण ४ ठिकाणी ६ पास केंद्र सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊन पास केंद्रावर गर्दी झाल्यास आणखी पास केंद्र देखील सुरू करण्यात येतील. परंतु सद्यस्थितीत वरील प्रमाणे उपलब्ध असलेल्या पास केंद्रावर जाऊन आपण पास काढू शकतात. तसेच यासंदर्भात काही अडचण असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास कृपया सिटीलिंक हेल्पलाईन क्रमांक ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.