नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या सिटीलिंक ही शहर बससेवा तब्बल तीन दिवस ठप्प राहिली. वेतन मिळत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. अखेर हा संप आता मिटला आहे. शहर बससेवा आता उद्या (सोमवार, ७ ऑगस्ट) पहाटेपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसह नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वेतन मिळत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र हाती घेतले. गेल्या महिन्यातही या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे सलग २ दिवस बससेवा ठप्प होती. आता पुन्हा काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांनी पुकारले. कंत्राटदाराकडून वेतन मिळत नसल्याने कर्मचारी आक्रमक झाले. गेल्या आंदोलनावेळी झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने सांगितले होते की, थकीत वेतन तातडीने अदा केले जाईल. मात्र, कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांचा संयम संपला आणि त्यांनी आंदोलन सुरु केले. सलग तीन दिवस सेवा ठप्प राहिली. अखेर आता या आंदोलनावर तोडगा निघाला आहे.
दररोज लाखो प्रवासी शहर बससेवेचा लाभ घेतात. खासकरुन सकाळच्या सुमारास शहराच्या विविध भागातून शाळेत जाणारे विद्यार्थी, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, सरकारी वा खासगी कार्यालयात जाणारे कर्मचारी, अंबड आणि सातपूर या औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार, नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे जाणारे प्रवासी आदी त्याचा लाभ घेतात. शहर बससेवा बंद असल्याने या सर्वांचेच खुप हाल झाले. महापालिका आयुक्त, पालकमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून हा संप मिटवावा आणि शहर बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. अखेर संप मिटला असून सेवा उद्या सकाळपासून सुरळीत होणार आहे.
nashik city bus citilinc service stop employee strike
municipal corporation payment salary