नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य परिवहन महामंडळाच्या ताब्यात असलेली नाशिक शहर बस सेवा मागील वर्षी महापालिकेने ताब्यात घेतली. आता ती सुरळीत चालू झाली असतानाच अचानकपणे आज सकाळपासूनच शहर बस वाहतूक सेवा कर्मचा-यांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झाली होती. पण, पाच तासानंतर ही सेवा पुन्हा सुरु झाली. सिटी लिंक बस सेवेच्या तब्बल २०० बस आज सकाळपासून वाहकांच्या संपामुळे उभ्या होत्या. त्यामुळे पहाटेपासूनच प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. ऐन गणेशोत्सवात शहर वाहतूक ठप्प झाली. तसेच, सकाळीच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस न आल्याने विद्यार्थी व पालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यानंतर ११ वाजेच्या आसपास ही सेवा पुन्हा सुरळीत झाली. कर्मचा-यांच्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हा संप मागे घेतला.
पण, सकाळी बस कर्मचारी संपामुळे आणि बससेवा बंद असल्याने कामावर जाणारे कर्मचारी व कामगार तसे अन्यत्र प्रवास करण्यासाठी प्रवाशांना रिक्षा तथा खासगी वाहने यांची वाट पाहत तासनतास उभे रहावे लागले. तर शाळा , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील नानाविध समस्यांचा सामना करावा लागला. महानगरपालिकेच्या सिटी लिंक बस सेवेच्या २०० बस आज सकाळपासून वाहकांच्या संपामुळे बंद झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. वाहकांच्या वेग वेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले त्यानंतर हा तिढा सोडवण्यासाठी उपमहाव्यवस्थापक (वाहतूक) मिलिंद बंड हे चर्चेसाठी नाशिकरोड आगरात गेले. तेथे त्यांनी कर्मचा-यांची चर्चा करुन यावर तोडगा काढला. त्यानंतर ही बस सेवा पुन्हा पाच तासानंतर सुरु झाली.
हा आहे त्रास
सध्या सकाळच्या सत्रात दोनशे तर दुपारच्या सत्रात दोनशे अशा सुमारे चारशे बसेस ठेकेदारांमार्फत चालवल्या जातात. मात्र महापालिकेच्या कंपनीचे धोरण अत्यंत जाचक असल्याचा वाहकांचा आरोप आहे. बसमध्ये प्रवास करताना तिकीट काढण्यास विलंब झाल्यास अथवा गर्दीमुळे तिकीट काढणे शक्य नसल्यास किंवा एखादा प्रवासी हा निर्धारित थांबण्यापेक्षा पुढील थांब्यावर उतरल्यास वाहन चालकांना जबाबदार धरून तीन ते पाच हजार रुपये दंड तसेच निलंबनाची कारवाई केली जाते.
६५ वाहक निलंबित
तिकीट चेकरचा वेगळा ठेका असल्याने ही कारवाई केली जाते. आता पर्यंत ६५ वाहक निलंबित करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात वाहक दाद मागत आहेत मात्र कंपनीकडून कोणत्या प्रकारची दखल घेतली जात नाही या प्रकारामुळे आज सकाळपासून नाशिक रोड आणि पंचवटी या दोन्ही आगारातून बाहेर पडणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. काल गणेशोत्सवाची सुटी तर आज कामकाजाचा दिवस असल्यामुळे सकाळी शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी तसेच कर्मचारी कामगार वर्ग आणि अन्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. पण, संप मिटल्यामुळे आता प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
— CITILINC | Connecting Nashik (@CitilincNashik) September 1, 2022
Nashik City Bus Citilinc Service
Municipal Corporation Employee Strike