बोरगड…….एक हॅपनिंग जंगल
नाशिक शहरालगत साकारण्यात आलेले बोरगड हे जंगल खरं तर अनेकांचे आकर्षण आहे. हे जंगल काही एका दिवसात किंवा महिन्यात आकाराला आलेले नाही. त्यामागे अपार मेहनत आणि जिद्द आहे. हे जंगल आणि तेथील जैविक विविधतेविषयी आपण आज जाणून घेऊया…
मित्रांनो ,नाशिकच्या शहराच्या उत्तरेस पेठ रोडने गेले की उजव्या बाजूस रामशेज व डाव्या बाजूस बोरगड हे किल्ले दिसतात. त्यातला बोरगड, म्हणजेच बोरकडा तसा उंच, ३२०० फूट समुद्रसपाटीपासून उंची. त्र्यंबक रांग आणि सातमाळा रांग ह्यांच्या मधला सर्वात उंच डोंगर. रामशेज किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. बराचशा उत्साही तरुण वर्गाचे सुट्टीच्या दिवशी औटिंगला जायचे हे ठिकाण आहे. पण, बोरगडची वाट थोडी वेगळी, कारण हा मुळातच एअर फोर्सच्या ताब्यात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना तेथे प्रवेश नाही. बोरगडच्या पायथ्याशी तुंगलदरा नावाचे छोटेसे गाव आहे. येथूनच पुढे दोन ते अडीच किमी अंतराने बोरगडाच्या माथ्यावर जाणारा रस्ता वेधक आहे.
तर अशा या बोरगडाच्या पायथ्याशी जंगल उभारण्याची संकल्पना नाशिक वन विभाग आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक (NCSN) या निम सरकारी संघटनेने ठरवले. वर्ष होते २००७ सालचे. त्यांना मदतीसाठी महिंद्रा अँड महिंद्रा या नाशिकच्या कंपनीने अर्थसहाय्य व श्रमदान करण्याचे वचन दिले. शिवाय एअर फोर्स ने संरक्षणाची जबाबदारी घेतली.
प्रथम येथे असणाऱ्या झाडांचे सर्वेक्षण केले गेले. त्यानुसार व येथील हवामानानुसार वाढणाऱ्या योग्य त्या वृक्षांची नोंद करून त्यांची यथा योग्य अंतरावर वृक्ष लागवड केली. दरवर्षी एक लाख अशी सात वर्षे लागवड केली. या कामात तुंगल दर्यातील तरुणांचा मोठा वाटा आहे.
लागवडी नंतर त्यांना दर आठवड्यात २ ते ३ वेळेस पाणी दिले जायचे. NCSN ने ठिकठिकाणी वॉटर टॅन्क ठेवल्या. त्यामध्ये टँकरने पाणी भरले जायचे. त्यातून बादल्यांनी पाणी रोपट्यांना दिले जायचे. हे काम सततचे १० वर्षे केले. उन्हाळ्यात काही रोपटी मरायची, त्याठिकाणी पुनः वृक्षलागवड केली जायची.
महिंद्रा कंपनीद्वारे दर तीन वर्षांनी ऑडिट केले जायचे. ते सुद्धा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री (BNHS) या संस्थेकडून. ८५ % वृक्ष जीवित राहिले. वृक्ष लागवडीसाठी महिंद्रा कंपनीतील कामगार तसेच विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी व्हायचे. आता १२ वर्षानंतर येथे एक नैसर्गिकरित्या वाढत असलेले जंगल बघायला मिळते. एवढेच नव्हे तर काही दुर्मिळ अशा जंगली नैसर्गिक वनस्पतीही येथे दिसू लागल्या आहेत. सेरोपीजीया, ऑर्किडस, अमरी, रान हळद, आणि कितीतरी.
हळूहळू हे साध्या काटेरी कुरूप जंगलातून एक हॅपनिंग जंगल व्हायला लागले. दरवर्षी उन्हाळ्यात येथे विविध पुष्पवनस्पती वाढू लागल्या. त्यात पांगारा, पळस, काटेसावर, शिवण, शिरीष, बहावा, कॅशिया, स्पॅथोडीया, जॅकेरांडा, करवंद, आपटा, आंबा, निलगिरी, गुलमोहर, सोनमोहर आणि कितीतरी.
पावसाळ्यात मजा आणखीनच वेगळी. छोटे-छोटे पाण्याचे झरे, छोटे धबधबे, बेडूक, खेकडे, त्यांना खाणारे सर्प, पक्षी आणि खूप काही. ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात येथे विविध प्रजातीची फुलपाखरे, पतंग दिसू लागतात. मला आठवते आहे की, यांचे निरीक्षण करण्यासाठी बरेचसे अभ्यासू येथे येतात. जवळ जवळ २५ प्रकारची फुलपाखरांची नोंद येथे तेव्हा मिळाली.
हिवाळ्यात येणारे छोटे पक्षी, बुलबुल, सातभाई, शिंजिर, वटवट्या, इंडियन रॉबिन, मॅगपै रॉबिन, धोबी, शिक्रा, कोकीळ, चास, पावश्या या पक्ष्यांची मोठी रेलचेल दिसते. तसेच सुरेल अश्या शीळ ऐकू येतात. जंगल जिवंत झाल्याचा भास होतो.
आपल्या भागांत कधी न दिसणारा ब्लॅक बर्ड येथे सर्वप्रथम मला दिसला. आणि मी या जंगलाच्या प्रेमातच पडलो. युरेशियन रोलर, चातक, ग्रे बेलीड ककु, पॅराडाइझ फ्लाय कॅचर असे क्वचित दिसणारे पक्षी पण हमखास दिसू लागले. या भागात न दिसणारा बांबू पिट वायपर ह्या सर्पाचे निरीक्षण करताना मी हरखूनच गेलो.
हा अतिशय विषारी सर्प, पिल्लांना आपल्या अंगावर जन्म देतो आणि झाडाच्या फांदीवर बसून राहतो. एवढेच नाही तर येथे विविध प्राण्यांची संख्या आणि त्यांचे आढळणे सुरू झाले. साळिंदर, जंगली मांजर, कोल्हे, ससे, टॉनी ईगल, लांब चोचीची गिधाडे इत्यादींनी हे जंगल समृद्ध व्हायला लागले.
भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याचे, मोराचे तर हे माहेरघर ठरले. येथे खूप सारे मोर आहेत. त्यांना लपायला छोट्या दऱ्या, झुडपे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. एकदा तर मी भर उन्हाळ्यात रातवा पक्ष्याचे जमिनीवर असलेले घरटे पाहिले. एकदम बेमालूमपणे दगडांच्या आणि गवताच्या राशीत ३ ते ४ अंडी ठेवलेली जागा होती. गावकऱ्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी तर बिबट्याने येथे वाटचाल केली होती. जर ह्या प्रजातीला हे जंगल आकृष्ट करू शकते तर काय? समृद्ध जंगल म्हणताना ते हेच. हे जंगल घडत असताना मी पाहिले आहे. हे माझे परम भाग्य.
अशा या बोरगडाच्या जंगलाला ५ मार्च २००८ मध्ये “फर्स्ट कॉन्झर्वेशन रिझर्व्ह” (संरक्षित वन क्षेत्र) हा दर्जा महाराष्ट्र सरकारने दिला. तेव्हा येथे जंगल उभारण्याचे ज्यांनी स्वप्न पाहिले होते, त्या सर्वांचा आनंद गगनात मावेना. माझे परम मित्र कै. बिश्वरूप राहा हे Ncsn या संस्थेचे संस्थापक. त्यांचेही स्वप्न साकार झाले. त्यांनी हे दाखवून दिले की, जर आपण मनात आले तर जंगल सुद्धा उभारू शकतो. याचे हे जिवंत उदाहरण ठरले. या बोरगडाच्या जंगलावर मी मराठीतून एक शॉर्ट फिल्म बनवली आहे. ती सर्वांनी बघावी आणि इतरांनाही दाखवावी, अशी विनंती.
Nashik City Borgad Forest History Biodiversity and details Article by Satish Gogate Environment