नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भगुर येथील सुतारगल्लीत वॉल कंपाऊडची भिंत पाडण्याच्या वादातून दोन कुटुंबियात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
शाम पुंडलिक शिंदे व राजेंद्र बाळू सोनवणे असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (दि.६) भगुर येथील सुतार गल्ली भागातील कदम वाडा येथे घडली. संतोष बाळू सोनवणे (रा.संतगोरोबा चौक,सुभाषरोड भगुर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भाऊ राजेंद्र सोनवणे (रा.सुतारगल्ली,भगुर) यांच्या मालकीची भिंत पाडल्याने जाब विचारण्यासाठी गेलो असता अनिकेत बाळू शिंदे, शाम पुंडलिक शिंदे व बाळू पुंडलिक शिंदे आदींनी दोघा भावांना बेदम मारहाण केली.
या घटनेत संशयितांनी लोखंडी रॉड व विटा फेकून मारल्याने तक्रारदार सोनवणे जखमी झाले असून,याप्रकरणी शाम शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. तर शाम शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्व:ताच्या घरासमोरील वॉल कंपाऊडची भिंत पाडत असतांना राजेंद्र बाळू सोनवणे, संतोष बाळू सोनवणे,ज्योती राजेंद्र सोनवणे आदींनी शिंदे व त्यांच्या भावास बेदम मारहाण केली.
या घटनेत चाकू आणि लोखंडी गजाचा वापर करण्यात आल्याने शिंदे बंधू जखमी झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र सोनवणे यांना अटक केली आहे. या हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आडके आणि सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.