नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिक्षांच्या दोन अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे. वेगवेगळया भागात हे अपघात झाले. एका अपघा बस आणि रिक्षा आदळली तर दुस-या अपघातात रिक्षा व कंटेनर आदळली. या दोन्ही अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सातपूर आणि उपनगर पोलिस ठाण्यात अपघातांची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला अपघात नाशिक पुणे मार्गावरील विजय ममता सिग्नलवर झाला. याप्रकरणी बाळकिसन जगन्नाथ आव्हाड (रा.दापूर ता.सिन्नर ) यांनी तक्रार दाखल केली आहे. आव्हाड बुधवारी (दि.१२) द्वारका परिसरातून नाशिकरोड येथे जाण्यासाठी अॅटोरिक्षाने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. विजय ममता सिग्नल भागात भरधाव रिक्षा सिग्नलवर थांबलेल्या एस.टी.वर जावून आदळली. या अपघातात चालक विकी खंडू लोखंडे (३० रा.आंबेडकरवाडी,नाशिक पुणा मार्ग) हा जखमी झाला असून आव्हाड यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात स्व:ताच्या दुखापतीस आणि रिक्षाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.
दुसरा अपघात सातपूर औद्योगीक वसाहतीतील सीएट कंपनीसमोर झाला. भरधाव अॅटोरिक्षाने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने रेखा दिलीप सोनवणे (४८ रा.सातपूर),अनिता दत्तात्रेय वर्पे (३७ रा.ध्रुवनगर) व वैजयंती विरेंद्र यादव (२८ रा.शिवाजीनगर) या तीन महिला प्रवासी जखमी झाल्या. चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी हवालदार ए.एम.मुसळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात चालक प्रविण बाबुराव ठाकरे (रा.श्रमिकनगर) याच्याविरूध्द सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.