नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना प्रतिबंधक लसीकरणात १२ ते १४ या आणखी एका वयोगटाचा समावेश करण्यात आला. या अंतर्गत कॉर्बेव्हॅक्स (Corbevax) ही लस देण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रात उद्या (१७ मार्च) पासून १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु होणार आहे. शहरातील सहा लसीकरण केंद्रावर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे.
देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत असून, तिसरी लाट ओसरली आहे. त्यातच देशातल्या करोना प्रतिबंधक लसीकरणाची आकडेवारीही दररोज बऱ्यापैकी वाढत आहे. कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लस हेच सर्वांत प्रभावी माध्यम असल्याचे तिसऱ्या लाटेच्या उद्रेकात अधोरेखित झाले. लस घेतलेल्या बहुतांश जणांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. काही जणांना झाला तरीही त्याची कोणतीही ठळक लक्षणे नव्हती किंवा तो सौम्य होता. लसीकरणामुळे रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले नाही. त्यामुळे आतापर्यंत १५ वर्षे वयोगटपुढील नागरिकांना लसीकरण खुले केले होते. लसीकरणाचे वय आता १२ वर्षांपर्यंत कमी करण्यात आले.
नाशिक महापालिकेला ‘कॉर्बेव्हॅक्स’ लशींचे ७ हजार डोस मिळाले आहेत. येत्या गुरुवार (ता. १७) शहरातील ६ लसीकरण केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. शहरातील सहा ही लसीकरण केंद्रावर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने लसीकरणासाठी लाभार्थी नाव नोंदणी करू शकतात. सद्या स्थितीत कोविड विरुद्ध लसीकरण हेच प्रभावी प्रतिबंधनात्मक साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये आलेली तिसरी लाट हि सौम्य होती असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे वरील प्रमाणे सर्व वयोगटातील १ला किंवा २रा डोस घेणे बाकी असलेल्या नागरिकांनी आपले लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असे आवाहन मनपा आयुक्त मा. श्री कैलास जाधव ,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.
लसीकरण केंद्राची नावे पुढील प्रमाणे. (१२ ते १४ वयोगटासाठी)
१) मेरी कोविड सेंटर,पंचवटी
२)उपनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपनगर
३)कामातवाडे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,सिडको
४)बारा बंगला (सिव्हील) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,पारिजात नगर
५)इ.एस. आय. एस हॉस्पिटल , सातपूर
६)नवीन बिटको हॉस्पिटल ,नाशिकरोड