नाशिक – वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणत आणि वृक्षांना अनन्यसाधारण महत्त्व देत नाशिक महापालिके कडून नुकतेच नवीन नियम बनवण्यात आले आहेत. याचनियमानुसार, वृक्षतोड करणाऱ्यांना तब्बल १ लाखाचा दंड आणि पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. असे असले तरी या नियमांना भीक न घालता सिंहस्थ नगर येथील परदेशी चौकात २० वर्षे जुन्या वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे. याप्रकरणी वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महापालिकेकडे तशी तक्रार करण्यात आली आहे. त्याची आता चौकशी होणार आहे.
वृक्षप्रेमी अक्षय परदेशी यांनी नाशिक मनपा विभागीय कार्यालयात दाखल केलेल्या तक्रार अर्जानुसार, सिंहस्थ नगर येथील संभाजी स्टेडियमच्या मागील बाजूस परदेशी चौकात महापालिकेच्या जागेतील वीस वर्षे जुने असलेले दोन वृक्ष अर्धवट स्वरूपात तोडण्यात आले आहेत. याकरिता कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. ज्याठिकाणी वृक्षतोड झाली त्याच्या समोरच मालपाणी बिल्डरकडून बहुमजली इमारत साकारली जात आहे. वृक्षतोड संदर्भात बिल्डर राधेय मालपाणी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. याबाबत ते म्हणाले की, हे वृक्ष महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तोडले आहेत. तर या संदर्भात आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याचे महावितरण अधिकारी मोरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महापालिकेचे उद्यान विभागाचे निरीक्षक अनिल परब यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले आहे की, या वृक्षतोडी संदर्भात कुणीही परवानगीसाठी अर्ज केलेला नाही किंवा परवानगी दिलेली नाही. याप्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता याबाबत पुढे काय होते, याकडे सिडकोवासियांचे लक्ष लागले आहे.