नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये आणि खासकरुन सिडकोत गुन्हेगारीला ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वी धारधार शस्त्रांद्वारे दहशत माजवून वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. तर, आता भररस्त्यात रिपाइं पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांचा कुठलाही वचक राहिला नसल्याचे स्पष्ट होत असून यामुळे नागरिक मात्र भयभीत झाले आहेत.
सिडकोतील उत्तम नगर भागात सामाजिक कार्यकर्ते तसेच आरपीआय पक्षाचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला . या घटनेत जाधव यांच्या उजव्या पायाच्या माडीवर दोन गोळ्या शिरल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहे. घटनास्थळी तात्काळ पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला असून हल्लेखोरांचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे या घटनेने संपूर्ण सिडको परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एकीकडे पोलिस गुन्हेगारी कमी झाली असल्याचा दावा करत जरी असले तरी देखील सिडको भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रशांत जाधव हे सोमवारी (दि.14) रात्री घरी जात असताना उपेंद्रनागर येथे यांच्या घराजवळच साडेअकरा वाजेच्या सुमारास एका दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने जाधव यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या यापैकी एक गोळी जाधव यांच्या डाव्या पायाच्या मांडीत घुसली. गोळीबार केल्या नंतर हललेखोर यांनी पलायन केले. या गोळीबारात जाधव यांच्या डाव्या पायाच्या मांडी मध्ये गोळी घुसली. यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच असलेल्या कल्पतरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती ती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितल.
चार ते पाच दिवसांपूर्वी सिडकोतील उत्तम नगर परिसरात अज्ञात पाच ते सहा टवाळखोरांचा टोळक्याकडून उत्तम नगर भागात दहा ते बारा चार चाकी आलिशान वाहनांसह दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. त्यात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याचा प्रकार घडल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात पोलिस परवानगी देत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.