भारतीय संस्कृतीतील आयुर्वेद शास्त्र घरोघरी पोहोचविणे, त्यासाठी वैद्यांना निरंतर शिक्षण देणे, संशोधनाला चालना देत वैद्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना संघटित करणे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुमारे तीन दशके कार्यरत असलेल्या ‘आयुर्वेद व्यासपीठा’च्या केन्द्रीय कार्यालयाचे – चरक सदनाचे – उद्घाटन उद्या नाशिकमध्ये होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ . मोहनजी भागवत यांच्या हस्ते दुपारी २.३० वाजता हा लोकार्पण सोहळा होईल. व्यासपीठाच्या जडण घडणीचे एक शिल्पकार आणि भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नाशिक आणि आयुर्वेद व्यासपीठ याचे एक अतूट नाते आहे. नाशिकला आयुर्वेद संशोधनाची एक अभिमानास्पद परंपरा आहे. व्यासपीठाच्या स्थापनेचे विचारमंथन डोंबिवली आणि कोयना परिसरातील राममळ्यात झाले पण बीजारोपण झाले ते नाशिकला. डोंबिवलीचे वैद्य विनय वेलणकर, नाशिकचे वैद्य विजय कुलकर्णी, वैद्य एकनाथ कुलकर्णी, वैद्य रजनी गोखले, वैद्य सरिता वैद्य, वैद्य उपासनी, वैद्य अभय कुलकर्णी, वैद्य संजीव सरोदे, औरंगाबादचे वैद्य संतोष नेवपूरकर आदींनी व्यासपीठाच्या रोपट्याचे परिश्रमपूर्वक सिंचन केले. ‘सेवा – संशोधन – प्रचार – शिक्षण’ हा चतुर्विध पुरुषार्थ अंत:करणात ठेवून आजपर्यंत आयुर्वेद घरोघरी पोहोचविला. या वैद्यमंडळींनी प्रसंगी व्यवसाय बाजूला ठेवून सारा महाराष्ट्र आणि नंतर सभा-संमेलनाच्या निमित्ताने सारा देश पालथा घातला. व्यासपीठाची घटना तयार करण्यासाठी आमचे स्नेही वैद्य विजय कुलकर्णी यांनी श्री. विनय सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र परिश्रम घेतले.
आयुर्वेद शास्त्र, चिकित्सा-उपचार, शिक्षण आणि चिकित्साशास्त्राचा सन्मान या आघाड्यांवर पिछेहाट होत असताना त्याला उर्जितावस्था मिळवून देण्याचे भगीरथ कार्य आयुर्वेद व्यासपीठाने केले आहे. छोट्या-छोट्या बैठकांपासून कार्य सुरू करीत ‘रुग्णचर्चा सत्र’ हा कार्याचा मूलमंत्र निश्चित करण्यात आला आणि महाराष्ट्रातील २५-३० जिल्ह्यात आणि गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, गोवा, केरळपर्यंत याचा विस्तार झाला. आज व्यासपीठ कार्यकर्ता वैद्यांची संख्या हजारावर आहे. दरवर्षी विविध विषयावरील व्याख्याने, चिकित्सा शिबिरे, वनौषधी प्रदर्शने, सेवाभावी दवाखाने चालविणे, समाज माध्यमातून लेखन, व्याख्याने असे उपक्रम होतात.
व्यासपीठाच्या सर्व कार्याचे नियोजन आणि मंथन करण्यासाठी नाशिकची निवड सार्थ म्हणावी लागेल. द्वारका चौकाजवळील ट्रँक्टर हाऊसच्या मागे द्वारकापुरम् संकुलात ‘चरक सदन’ आकाराला आले आहे. सुसज्ज अशा या केन्द्रीय कार्यालय वास्तुत प्रशस्त हॉल, प्रचारकांसाठी निवास व्यवस्था, सुसज्ज ग्रंथालय आहे. व्यासपीठाच्या वाटचालीत आयुर्वेद सेवा संघ आणि आयुर्वेद पत्रिका मासिकाचे योगदान अमूल्य आहे. आणि ‘ चरक सदन’ हा कळसाध्याय आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!