नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील पेठेनगर भागात चंगाई सभेच्या नावाखाली भलताच उद्योग होत असल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीसह वैद्यकीय कक्ष, जागरुक संघ आदींनी याची दखल घेत थेट पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. या सभेत जादूटोणा आणि अंधश्रद्धांना खतपाणी घातले जात असल्याचा काहींचा आरोप आहे तर काहींचे म्हणणे आहे की, येथे व्यक्तींचे धर्मांतरण केले जात आहे.
अंनिसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठे नगर, नाशिक येथे ” चंगाई ” सभेच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या माध्यमातून अज्ञानी, अगतिक, असाध्य रोगाने पिडलेल्या व्यक्तींना फसवून, त्यांचे आर्थिक व मानसिक शोषण होत असलेल्या भोंदूगिरीचा प्रकार जागरुक नागरिकांनी उघडकीस आणला आहे. त्याबाबत त्यांनी आपल्या पोलिस स्टेशनमध्ये या भोंदूविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदनही दिले आहे. महाराष्ट्र अंनिसतर्फे आम्ही या जागृक नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आम्ही या निवेदनाद्वारे आपणास नम्र विनंती करतो की ,सदर भोंदूबुवाची सखोल चौकशी करून, त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना, त्याने अवैज्ञानिक आणि अशास्त्रीय पद्धतीने आत्ता पर्यंत किती पिडींतांवर इलाज केले, कधीपासून तो इलाज करीत आहे, कशाप्रकारे इलाज करतो, त्यात किती लोक फसले गेले ,त्यातून लोकांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याशी त्याने कसा कसा खेळ केला, या भोंदूबुवा ला सहकार्य करणारे कोण, कोण आहेत, अशा विविध अंगाने चौकशी करून ,त्यांचे पुरावे आपण जमा करावेत, अशी विनंती आहे.
आपल्या देशाच्या घटनेने भारतीय नागरिकाला , त्याला पटेल ,आवडेल तो धर्म स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे स्वातंत्र्य जरूर दिलेले आहे. मात्र बळजबरीने कुणी, कुणाला धर्मांतर करण्याची सक्ती करू शकत नाही. मात्र, हा भोंदूबुवा एका विशिष्ट धर्माचा असून ,तो कोणाच्या तरी इशाऱ्यावर लोकांना धर्मांतरासाठी बळजबरी करतो की काय, याबाबतही सखोल चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. म्हणून सदर भोंदूबुवाची सखोल चौकशी करून,ठोस पुरावे मिळवावेत आणि त्यांवर बोगस डॉक्टर विरोधी कायदा तसेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी, अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
येथे हिंदू धर्मातील आर्थिक कमजोर आणि अशिक्षितांना हेरून धर्मांतरासाठी चंगाई सभेेद्वारे तयार केले जात आहे.देशासह राज्यात व नाशिक शहर उपगरातील विशेष वस्ती भागात हिंदूंच्या नावावरच राजकारण केले जात आहे.भाजप,शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्वहिंदू परिषद यासारखे राजकीय पक्ष आणि संघटना हिंदूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असतांना नाशिक शहरातिल इंदिरानगरात सुरू असलेला हिंदूंना धर्मांतराचा चंगाई कार्यक्रम शिंदे गटातील महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे व वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेश म्ह्स्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रकार पाहून उघडकिस आणला आहे.याबाबत इंदिरानगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे याना निवेदन देण्यात आलै आहे.
इंदिरानगरातील पेठेनगर परिसरातील एका मोकळ्या भूखंडामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये जवळपास २०० ते ३०० हिंदू समाजातील महिला पुरुष लोकांना एकत्र आणून चंगाई सभेच्याद्वारे धर्मात धर्मांतर करण्यासाठी वेगवेगळी प्रकारची आमिषे दिली जात असल्याचे समोर आणले. ते त्यांच्या धर्मात कसे साक्षात्कार होतात दुर्धर आजारपण कसे बरे होतात हे दाखवले जात असल्याची माहिती ताठे यांना समजताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन हा चालू असलेला प्रकार बंद पाडला.इंदिरा नगरातील शांत सेवानिवृत्ताचे नगर अशी ओळख असलेल्या उच्चभ्रू आणि दाट लोकवस्तीच्या ठिकाणच्या वस्तीतील हिंदूंना धर्मांतर करण्याच्यासाठी दर रविवारी विशेष शिबीराचे आयोजन केले जात असे. या शिबिरात काही विशिष्ट लोकांना स्टेजवर उभे करून त्यांना असलेले गंभीर आजार आणि त्यांनी धर्मांतर केल्यानंतर त्यांच्या धर्माच्या देवामुळे त्यांची हाणामारीच्या प्रकरणातून, गंभीर आजारातून विना औषोधोपचार किंवा विना शस्त्रक्रिया कशा पद्धतीने बरे झाले हे शेडमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना सांगत होते.
या संपूर्ण धर्मांतराच्या प्रक्रिये करता विशिष्ट समाजातील लोकांना तसेच आर्थिक कमकुवत आणि अशिक्षितांना हेरून त्यांना आर्थिक मदतीचे, मोफत अन्नधान्य देण्याचे आश्वासन देत त्यांना या जाळ्यात ओढले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही वर्षांपूर्वी अश्या धर्मांतराच्या घटना पेठ, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा, पालघर अशा दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवर घडत असल्याचे ऐकीव होते पण आता असे प्रकार शहरातिल सिडको, पंचवटी, नाशिकरोडसह इंदिरानगर भागात सुरु झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकरणाची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली असून या प्रकरणात लवकरच धर्मांतर करण्यासाठी परावृत्त करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीद्वारे इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्याकडे वैद्यकीय कक्ष उपप्रमुख योगेश म्हस्के, लक्ष्मी ताठे, मामा ठाकरे शिवा पालकर, सुरेश कन्नडकर, सुमित बोराळे, संजय गालफडे, आदेश पगारे आदींनी केली आहे.
Nashik Changai Religious Transformation