चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूड घाटात बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. मुंबईच्या दिशेने जात असलेल्या स्कोडा कारला अचानक इंजिन जवळ आग लागली. रात्री घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच सोमा टोल कंपनीच्या अग्निशामक दलाने धाव घेत आग विझवली.
दरम्यान गाडीला आग लागताच चालकासह गाडीतील प्रवाशांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. कारला आग लागल्याने महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसात वाहनांना आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे.
नाशिक शहराजवळ खासगी प्रवासी बसला आग लागल्याच्या घटनेत अनेक प्रवासी मृत्य़ुमुखी पडले होते. त्यानंतर समृद्दी महामार्गावरही अशीच भीषण घटना घडली. वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. या आगी का लागतात याचा शोध घेऊन त्यावर उपयाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.