नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (सीबीएफसी) आज ‘बहत्तर हुरें’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या मुद्द्याबाबत निवेदन जारी केले आहे. माध्यमांमध्ये यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा हवाला देत मंडळाने म्हटले आहे की, “बहत्तर हुरें (72 हुरें)हा चित्रपट आणि त्याचा ट्रेलर यांना प्रमाणपत्र देण्यास केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने नकार दिला आहे अशा आशयाच्या काही दिशाभूल करणाऱ्या बातम्या माध्यमांच्या काही विभागांमध्ये प्रसारित होत आहेत.”
मंडळाने पुढे स्पष्ट केले आहे, “याउलट, बहात्तर हुरें (72 हुरें) या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे आणि हे प्रमाणपत्र 4 ऑक्टोबर 2019 रोजी जारी करण्यात आले. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध करण्यासाठी 19 जून 2023 रोजी अर्ज करण्यात आला असून त्यासंदर्भात पुढील प्रकिया सुरु आहे. सिनेमॅटोग्राफ कायदा,1952 च्या कलम 5बी(2) अंतर्गत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार या ट्रेलरचे परीक्षण केले जात आहे.”
सीबीएफसीने असे देखील सांगितले आहे की अर्जदारांना काही आवश्यक दस्तावेज सादर करण्याची सूचना देण्यात आली होती आणि हे दस्तावेज मिळाल्यावर काही सुधारणा करण्याच्या अटीवर चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात आले. या सुधारणांच्या संदर्भात सूचित करण्यासाठी 27 जून 2023 रोजी अर्जदार/ चित्रपट निर्माता यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि या नोटीसवर अर्जदारांचा प्रतिसाद/अनुपालन येणे प्रलंबित आहे” या मुद्द्यासंदर्भात योग्य प्रक्रियेच्या माध्यमातून कामकाज सुरु असून यासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही बातम्यांवर यापुढे विश्वास ठेवू नये तसेच त्या पसरवू नयेत अशी विनंती मंडळाने केली आहे.