नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरीपासून भंडारा-गोंदियापर्यंत विस्तारलेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३०३०च्या प्रांतपालपदी नाशिकचे ज्ञानेश्वर शेवाळे यांची (2025-26) साठी निवड झाली आहे.बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर नाशिकला पुन्हा एकदा हा बहुमान मिळाल्याने नाशिकच्या रोटेरियनमध्ये आनंदाचे वातावरण असून शेवाळे यांच्यावर अभिनंदनाचा एकच वर्षाव होत आहे.
शेगाव कॉन्फरन्समध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत शेवाळे यांनी जळगावचे डॉ.राजेश पाटील यांचा पराभव केला म्हणूनच त्यांचे हे यश खुलून दिसते.या आधी नाशिकचे डॉ.ए.के.पवार, दादासाहेब देशमुख, बाळासाहेब जोशी,आर.के.भारद्वाज, रमेश मेहेर,श्रीमती आशा वेणुगोपाळ यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे.
नाना या नांवानें सर्वांना परिचित असलेले ज्ञानेश्वर शेवाळे हे नाशिकमधील समर्थ ज्यूस सेंटरचे संचालक आहेत. वडिलोपार्जित हातगाडीवरील ज्यूसच्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन आज त्याचे रूपांतर मोठ्या व्यवसायात करण्यात आणि त्याचे विविध शाखांचे जाळे विणण्यात शेवाळे यांचा सिंहाचा वाटा आहे.या व्यवसायाच्या माध्यमातून नानांचा जनसंपर्क वाढत गेला आणि नंतर सामाजिक कार्याद्वारे ते रोटरीत आपसूकच ओढले गेले.संवाद कौशल्य आणि कार्यतत्परतेच्या जोरावर अल्पावधीतच सदस्यपदापासून रोटरीच्या प्रांतपालपदापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांनाच अचंबित करणाराच आहे. २००६-०७ ला ते रोटरीचे सदस्य झाले.त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलेच नाही.
व्यवसाय सांभाळून त्यांनी यशाला घातलेली गवसणी वाखाणण्याजोगीच आहे. २०१०-११ ला शेवाळे हे रोटरी क्लब ऑफ नासिक नाॅर्थचे चार्टर्ड सेक्रेटरी झाले. नंतर प्रेसिडेंट इलेक्ट, प्रेसिडेंट आदी महात्वची पदे भूषविली. २०१७-१८ ला सह प्रांतपालपदी ते निवडले गेले. डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी,काॅन्फरन्स को-चेअरमनपदेही त्यांनी भूषविली आहेत. रोटरीतील त्यांच्या कार्याचा धडाका पाहता त्यांच्याकडे प्रांतपालपदाची जबाबदारी आली असून ते ही जबाबदारी लीलया पेलतील आणि रोटरीच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून ते रोटरीला नव्या उंचीवर नेतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Nashik Businessman Dnyaneshwar Shewale Rotary Prantpal
Samartha Juice Rotary International