नाशिक (इंडिया दर्पण) – लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याला नाशिक न्यायालयाने दणका दिला आहे. खरे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीन मिळावा म्हणून न्यायालयाकडे अर्ज केला होता. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) योग्य पद्धतीने बाजू मांडल्याने खरेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळेच न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कायदेशीर पद्धतीने निवडून आलेल्या संचालकांविरोधात सहकार विभागात दाखल दाव्याचा
निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्याच्या मोबदल्यात लाच स्विकारतांना खरे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. तीस लाख रुपये घेताना अटक झालेला उपनिबंधक सतीश खरे अनुक्रमे चार व एक असे पाच दिवसांपासून पोलिस कोठडीत होता. शनिवारी (दि.२०) त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. खरे याच्या घरझडतीत १६ लाखांच्या रोकडसह ५४ तोळे सोने एसीबीच्या हाती लागले आहे.
खरे याची आणखी कसून चौकशी होणे आवश्यक असल्याचा युक्तीवात एसीबीच्यावतीने न्यायालयात करण्यात आला. त्याची दखल न्यायालयाने घेतली. त्यामुळेच न्यायालयाने खरे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे खरेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याला आता कोठडीतच रहावे लागणार आहे. तसेच, एसीबीकडून अधिक चांगल्या गतीने तपास केला जाणार आहे. त्यात आणखी काही घबाड गवसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एसीबीच्यावतीने सरकारी वकील बगदाणे यांनी युक्तीवाद केला. तर, खरेच्यावतीने वकील भिडे यांनी बाजू मांडली. तर, एसीबीच्यावतीने तपासी अधिकारी अभिषेक पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर आणि अपर पोलिस अधिक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी पुढील कार्यवाही करीत आहे.
Nashik Bribe DDR Satish Khare Court