नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भंगार वस्तू खरेदी केल्याच्या मोबदल्यात व्यावसायिकास दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या कामगार आाघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार मंडळाचे सदस्य विक्रम सुदाम नागरे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने तीन महिने कारावास आणि २९ लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणाची माहिती अशी की, भारतीय माजी सैनिक संघटनेचे सहसचिव सर्जंट फुलचंद पाटील यांचे वुडन मटेरियल या नावाने भंगार मालाच्या वस्तूंचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय त्यांचा मुलगा विकास पाटील सांभाळतात. २०१६ मध्ये विक्रम नागरे यांनी पाटील यांच्या दुकानातून स्क्रॅम मटेरियल खरेदी केले होते. त्या मोबदल्यात नागरे याने १३ लाख व ५ लाख रुपयांचे वेगवेगळे दोन धनादेश पाटील यांना दिले. मात्र, धनादेश बँकेत न वटल्याने परत आले. याबाबत पाटील यांनी नागरे यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. परंतू त्यांनी वेगवेगळे कारणे देत पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेरीस पाटील यांनी नागरे यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. एच. पाटील यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी होवून विक्रम नागरे यास दोषी ठरविले.
फिर्यादी पाटील यांच्या वतीने ॲड. बाबासाहेब ननावरे यांनी युक्तीवाद केला. दोन्ही खटल्यात न्यायालयाने प्रत्येकी तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच, दोन्ही खटले मिळून २९ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी २६ लाखांची रक्कम पाटील यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. माजी नगरसेविका पुत्र असलेल्या नागरे हे भाजपाच्या उद्योग आघाडीचा पदाधिकारी असून, शासनाच्या शासकीय किमान वेतन कायदा सल्लागार मंडळाचा माजी सदस्यही आहे.