इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्याविरुध्द तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार मागे घेतल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही तक्रार असल्यामुळे या दोन्ही नेत्यांचा भाजप प्रवेश रखडला होता. आता शिवसेनेतील या दोन्ही नेत्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटातून या अगोदर सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये तर विलास शिंदे हे शिंदे गटात दाखल झाले. त्यानंतर नाशिकमधील तीन माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे, माजी उपनेते सुनील बागुल यांच्यासह काही पदाधिका-यांचा प्रवेश सोहळा भाजपमध्ये होणार आहे.
याअगोदर हा प्रवेश सोहळा होणार होता. पण, ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी भारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे. नाशिक मध्ये शिवसेना पदाधीका-यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले. क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे, सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही! राऊत यांच्या या वक्तव्यानंतर काही पदाधिका-यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याला ब्रेक लागला होता. त्यात नवनिर्वाचित शिवसेना महानगरप्रमुख मामा राजवाडे, उपनेते सुनील बागुल यांच्यासह काही पदाधिका-यांचा प्रवेश सोहळा लांबणीवर पडला होता.
तक्रारदाराने घेतली तक्रार मागे
मामा राजवाडे, उपनेते सुनील बागुल यांच्याकडून मला मारहाण झाली नसल्याचे सांगून गुन्हे दाखल करणा-या व्यक्तींनेच तक्रार मागे घेतली. या प्रकरणाबाबत सुनील बागुल यांनी सांगितले की, गुन्ह्याबाबत भाजप प्रवेशाचा संबध नव्हता, तत्पूर्वी पक्षाने खात्री करायला पाहिजे होती. पक्षाने आमची विचारपूस करायला पाहिजे होती. पण, हकालपट्टी हा शब्द चुकीचा आहे. आमच्यावर गुन्हा दाखल केला होता तो चुकीचा होता. केवळ मंत्री असल्याने गिरीश महाजन यांना आम्ही भेटायला गेलो होतो. मात्र, पक्षातून आमची हकालपट्टी केल्याने आम्हाला पुढचा मार्ग मोकळा झाला. तर मामा राजवाडे यांनी तक्रारदार यांना मित्रता जागी झाली आणि त्यांनी गुन्हे मागे घेतले. आता, शिवसेनेत माझ्या जागेवर दुस-या व्यक्तीची नेमणूक केली आहे. त्यामुळे पुढचा निर्णय घेईल, माझी पुढची दिशा लवकर ठरवू असे ते म्हणाले.