नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली ९९ उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. या यादीत नाशिक जिल्ह्यातील विदयमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पण, या यादीत नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे नाव नाही. ज्या चार विद्यमान आमदारांना संधी दिली. त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिका-यांचा विरोध आहे. पण, हा विरोध डावलून त्यांनाच संधी दिल्यामुळे भाजपला विरोधी पक्षांबरोबर लढण्याअगोदर स्वकीयांशीच अगोदर सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या चारही जागा रेड झोनमध्ये आहे.
या पहिल्या यादीत नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, नाशिक पूर्व राहुल ढिकले, तर बागलाणमध्ये दिलीप बोरसे, चांदवडला डॅा. राहुल आहेर यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे चांदवडमध्ये डॅा. राहुल आहेर यांनी माघार घेतली होती. येथे त्यांचे बंधु केदा आहेर यांना उमेदवारीसाठी पक्षाकडे शिफारस केली होती. पण, या ठिकाणी पक्षाने पुन्हा डॅा. राहुल आहेर यांनाच संधी दिली. त्यामुळे येथे स्वकीयांकडून विरोध होणार आहे.
त्याचप्रमाणे नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांना पक्षांतर्गत मोठा विरोध असतांनाही पक्षाने त्यांना संधी दिली. त्यामुळे हा नाराज गट आता कितपत मदत करतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. राहुल ढिकले यांच्याबरोबरच गणेश गिते, बाळासाहेब सानप हे सुध्दा उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी करत होते. पण, त्यांना संधी मिळाली नाही. आता हे दोन्ही नेते तुतारी घेण्याच्या तयारीत आहे.
तर बागलाणमध्ये दिलीप बोरसे यांनी उमेदवारी न देता ती माजी केंद्रीय राज्य मंत्री डॅा. भारती पवार यांनी द्यावी अशी मागणी होती. पण, पक्षाने त्याकडे फारसे गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे येथेही स्वकीयांचाच सामना करावा लागणार आहे.