नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर तालुक्यातील सोनगीरी येथे एका नऊ वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. यात चिमुकली जखमी झाली आहे. गौरी राजेंद्र लहाणे हे चिमुकलीचे नाव आहे. तीच्या पायाला जखम झाली असून तीच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. गौरी ही वडीलांबरोबर सायंकाळी ७ वाजता सोनगीरी येथून नायगावला दुचाकीने जात असतांना पाटाजवळ बसलेल्या बिबट्याने अचानक दोघांवर झडप घातली. या दोघांनी आरडोओरड केल्यानंतर बिबट्याने येथून धूम ठोकली. पण, या हल्यात गौरीचा उजवा पाय बिबट्याच्या जबड्यात आल्यामुळे तीच्या पायाला जखम झाली आहे. या बिबट्याच्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हल्यानंतर सोनगीरी आणि नायगाव परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे.