नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले असून राष्ट्रवादी भवन येथे त्यांनी निदर्शने करत नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवार पार पडला. या विस्तारात एकूण ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेतली. यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने समर्थक नाराज झाले आहेत. भाजपच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिक्त असून ते भुजबळांना देण्यात यावे अशी मागणी यावेळी समर्थकांनी केली. भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांनी भुजबळ साहेबांना मंत्री मंडळात न्याय द्यावा अशा घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली. आंदोलन केल्यामुळे मुंबई नाका परिसरातील मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिला.
यावेळी अंबादास खैरे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, पुजा आहेर, डॉ. प्रविण गुल्ले, संतोष खैरनार, राजेंद्र जगझाप, शिवा काळे, शशी बागूल, दुर्गेश चित्तोड, आशा भंदुरे, चंद्रकांत माळी, राजेंद्र भगत, डॉ. विष्णु आत्रे, संदीप भालेराव, बाबा गायकवाड, आकाश विश्वकर्मा, विशाल चव्हाण, रविंद्र वेळजाळी, प्रविण जगताप, विलास दराडे, मेघा दराडे, माधुरी आखाडे, निर्मला सावंत, संजीवनी जाधव, मीनाक्षी काकळीज, रोहिणी रोकडे, रूपाली पठाडे, अमोल नाईक, संतोष भुजबळ, मुकेश शेवाळे, रविंद्र शिंदे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.