नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहकार क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व भास्कर कृष्णा कोठावदे (वय ७३) यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली.
नाशिक जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशनचे ते अध्यक्ष होते. अनेक पतसंस्था आणि को ऑपरेटिव्ह बँकांच्या संचालक मंडळावर ते होते. तर, काहींचे नेतृत्वही त्यांनी केले. गेल्या चार ते पाच दशकांपासून ते सहकार क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे या क्षेत्रातील अतिशय जाणकार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अर्बन बँक फेडरेशन, नामको बँकेसह अनेक नामवंत सहकार संस्थांच्या कार्यात त्यांचा मोठा वाटा होता. तसेच, लाडशाखीय वाणी समाज मंडळाचेही ते अध्यक्ष होते. समाजाच्या जडणघडणीतही त्यांची महत्त्वाची भूमिकी होती.
सहकारातील आधुनिक संकल्पना आणि व्यवस्थापनातील अनेक प्रयोग त्यांनी संस्थांना सोबत घेऊन प्रत्यक्षात आणले व त्याला समाजमान्यता मिळवून दिली. त्यांनी अनेक सहकारी संस्थांवर काम केले. संस्थांना विकासाभिमुख दिशा दिली. तसेच त्यांच्या प्रश्नांची सोडवणूकही केली. सहकारातल्या प्रश्नांची नाळ जुळलेला खंदा कार्यकर्ता म्हणूनही त्यांचा लौकिक होता. दिलखुलासपण, संघटन कौशल्य हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते.
त्यांच्या पश्चात पत्नी मालती, मुलगा लक्ष्मीकांत, जितेंद्र, अविनाश, मुलगी सुवर्णा, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (२४ मे, मंगळवार) रात्री १० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या राहत्या घरापासून (११०, कृष्णास्मृती, डिसुझा कॉलनी, गंगापूररोड, नाशिक-५) अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे.