मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार, जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ राज्यात सुरु करण्यात आले आहे. तसेच, नाशिक शहराजवळील भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून हे साकारले जाणार असून त्यासाठी विभागाने निविदा मागविल्या आहेत.
‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’
देशातील पहिल्या ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’मध्ये सावकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक, रत्नागिरी, पुणे आणि सांगली येथील ठिकाणे आहेत. यामध्ये सावरकरांचे जन्मस्थान भगूर वाडा आणि अष्टभुजा देवी मंदिर, नाशिक येथील अभिनव भारत मंदिर, तीळभांडेश्वर गल्ली, डेक्कन येथील सावरकर अध्यासन केंद्र, पहिली विदेशी कपड्यांची होळी, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिर, शिरगाव रत्नागिरी येथे सावरकर काही काळ वास्तव्यास होते ती खोली तसेच डॉ. हेडगेवार आणि सावरकर यांची पहिली भेट झाली ते ठिकाण, गुरव समाजाचे मारूती मंदिर, रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिर, सावरकारांनी सुरू केलेली कन्या शाळा, दादर येथील सावरकर सदन आणि सावरकर स्मारक,सांगली येथील बाबाराव सावरकर स्मारक या ठिकाणांचा समावेश आहे.
थीम पार्क
भगूर येथे निर्माणधीन ‘थीम पार्क’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून स्वा. सावरकरांच्या विचार-दर्शनावर आधारित भव्य थीम पार्क व संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे. राष्ट्रासाठी असीम त्याग व समर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना, त्यांच्या विचार व कार्याला या भव्य पदयात्रा व कार्यक्रमाच्या निमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे. त्यामुळे भगूर, नाशिक शहर, जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून अधिकाधिक सावरकरभक्त नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग तसेच अन्य सहयोगी संस्था-संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भगूर येथील स्मारक अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नव्या पिढीसाठी स्फूर्तीस्थळ ठरणार आहे. “नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म झाला. “सावरकर वाडा” या घरात त्यांचे बालपण गेले. त्याच घरात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी केला. या वाड्याला राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने स्मारकाचा दर्जा दिला. हे स्मारक आणि या वाड्याच्या भिंती केवळ माती विटांच्या भिंती न राहता त्या वि. दा. सावरकर यांचा जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या बोलक्या भिंती व्हाव्यात”, अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे. भगूर या गावात प्रवेश करताच विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट समोर यावा अशा पद्धतीने हे थीम पार्क साकारले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
Nashik Bhagur Svatantryaveer VD Savarkar Memorial