नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टार एअरने नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू केले असून दि.३ फेब्रुवारी २०२३ पासून नाशिक स्टार एअरची नाशिक-बेळगाव विमानसेवा होणार सुरू होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उड्डाण योजने अंतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्देशानुसार, स्टार एअरने बेळगाव-नाशिक-बेळगाव विमानसेवेसाठी बुकिंग पुन्हा सुरू केली असल्याची माहिती उद्योजक मनीष रावल यांनी दिली आहे.
छगन भुजबळ यांनी नुकतीच केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे नाशिक विमानतळावरून उड्डाण योजनेला पुन्हा मुदतवाढ देऊन विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून दि. ३ फेब्रुवारी २०२३ पासून स्टार एअरलाइन प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी नाशिक बेळगाव विमानसेवा सुरू करणार आहे. त्यासाठी त्यांनी बुकिंग देखील सुरू केली आहे. तसेच दुसऱ्या कंपन्यांच्या देखील विमानसेवा सुरू करण्यासाठी छगन भुजबळ यांचे प्रयत्न सुरू आहेत.
त्यानुसार एस ५, १४५ ही फ्लाइट बेळगावहून शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता निघेल नाशिक येथे १०.३० पोहचेल तर रविवारी सायंकाळी ५.०५ वाजता सुटेल आणि सायंकाळी ६.०५ वाजता नाशिकला पोहोचेल. तर एस ५, १४६ ही फ्लाइट नाशिकहून शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता निघेल ११.४५ ला बेळगाव येथे पोहचेल. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता निघेल आणि सायंकाळी ७.३० वाजता बेळगावला पोहचेल. या मार्गावर ५० सीटर एम्ब्रेअर १४५ विमाने धावणार आहेत.
मात्र नाशिकचे नुकसानच
स्टार एअर कंपनीने नाशिक-बेळगाव विमानसेवेसाठी उडान योजनेत अर्ज केला. तो मंजूर झाला. विशेष म्हणजे, आठवड्यातील सातही दिवस ही सेवा देण्याचे कंपनीने हवाई वाहतूक मंत्रालयाला सांगितले. त्यानंतर कंपनीने प्रत्यक्ष सेवा सुरू केली. मात्र, कंपनीने सातही दिवस सेवा दिली नाही. आठवड्यातील काही दिवसच सेवा दिला. त्यानंतर कंपनीने अचानक सेवा बंद केली. आणि आता फेब्रुवारीपासून केवळ दोन दिवस म्हणजे शुक्रवार आणि रविवार या दिवशी सेवा दिली जाणार आहे. यातून नाशिकचेच नुकसान आहे.
सिंधुदुर्ग सेवा कधी
स्टार एअर कंपनीने नाशिक-सिंधुदुर्ग (चिपी) या मार्गासाठीही उडान योजनेत मंजुरी मिळवली आहे. मात्र, या कंपनीने अद्याप ही सेवा सुरू केलेली नाही. ही सेवा कधी सुरू होणार, याबाबत अनिश्चितता आहे. ही सेवा सुरू झाली तर कोकणातील पर्यटनासाठी नाशिककर थेट जाऊ शकतील. तसेच, कोकणातील पर्यटक नाशिकला येऊ शकतील.
Nashik Belagavi Air service Booking Started
Star Air Flight Aviation