नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत पुन्हा एकदा अध्यक्षपदी अॅड नितीन ठाकरे यांची निवड झाली आहे. त्यामुळे ते आता सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. मतमोजणी आज सकाळपासून सुरु आहे. अध्यक्षपदाच्या गटात मतमोजणीच्या अंतिम फेरीअंती उमेदवार अॅड नितीन बाबुराव ठाकरे यांना एकूण सर्वाधिक 1382 मते मिळाली. 129 मतांनी त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार महेश आहेर यांचा पराभव केला. सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची माळ ठाकरे यांच्या गळ्यात पडली आहे.
नाशिक बार असोसिएशनची सार्वत्रिक निवडणूक दर चार वर्षांनी होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे निवडणूक होऊ शकली नाही. अखेर यंदा ही निवडणूक झाली. या निवडणुकीत ११ सदस्यांसाठी ४० उमेदवार रिंगणात होते. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. ठाकरे, ॲड. महेश आहेर व ॲड. अलका शेळके यांची उमेदवारी होती. मतदारांनी सलग तिसऱ्यांदा ॲड. ठाकरे यांना पसंती दिली आहे. निकाल घोषित केल्यानंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. यावेळी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. बिपीन शिंगाडा, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. संदीप डोंगरे, सदस्य म्हणून भगवंतराव पाटोळे व ॲड. अतुल गर्गे यांनी कामकाज पाहिले.
निवडणूक निकाल आणि विजयी उमेदवार व मते अशी
अध्यक्ष – ॲड. नितीन ठाकरे – १,३८८
उपाध्यक्ष – ॲड. वैभव शेटे – १,४००
सचिव – ॲड. हेमंत गायकवाड – १,०९१
सहसचिव (पुरुष) – ॲड. संजय गिते – १,०८१
सहसचिव (महिला) – ॲड. सोनल गायकर – १,१८३
खजिनदार – ॲड. कमलेश पाळेकर – १,१८३
सदस्य – ॲड. शिवाजी शेळके – ९९५
सदस्य – ॲड. प्रतीक शिंदे – ८५२
सदस्य – ॲड. महेश यादव – ८११
सदस्य महिला – ॲड. अश्विनी गवते – १,३२६
सात वर्ष आतील – ॲड. वैभव घुमरे – १,४०२