नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्याकडे खरे तर बुद्धपौर्णिमेचे एक वेगळे महत्व म्हणजे जगलात केली जाणारी प्राणी गणना, प्रामुख्याने व्याघ्र आदी वन्यजिवांची. नासिकमधल्या साहसप्रेमींसाठी यंदाची बुद्ध पौर्णिमा आणखी एका कारणासाठी महत्वाची ठरणार आहे, हा दिवस जगातल्या काही उत्तम असे साहसपट घेऊन येणार आहे.
वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या वतिने सहाव्या बांफ चित्रपट महोत्सवाचे आयोजन ५ मे रोजी गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात
सभागृहात करण्यात आले आहे. सायंकाळी ५-३० ते रात्री ८-३० या कालावधीत यंदाच्या बांफ चित्रपट महोत्सवातील १३ लघुपटांचे प्रदर्शन
करण्यात येणार आहे. द हिमालयन क्लबच्या अधिपत्थ्याखाली दरवर्षी भारतातील दहा शहरात बांफ चित्रपट महोत्सव भरवला जातो. कॅनडात बांफ नॅशनल पार्क येथे पुस्तक व सांस्कृतीक महोत्सव मोठ्या प्रमाणावर भरवला जातो. त्यात जागतिक पातळीवरची साहसपटांची एक स्पर्धा खास बांफ माऊंटन फिल्म फेस्टिव्हल या नावाने भरवली जाते. त्यातील निवडक साहसपट जगप्रवासासाठी निघतात.
जगातल्या सुमारे अडीचशे देशात या साहसपटांचे प्रदर्शन केले जाते. यात प्रामुख्याने गिर्यारोहण, सायकलिंग, हायलाईन, नौकानायन, पॅराग्लाईड्स, निसर्ग अशा वेगवेगळ्या साहसी क्रीडाप्रकारावरचे लघूपट दाखविले जातात. हा चित्रपटांचा महोत्सव असला तरी यातले साहस हे खरेखूरेच असते म्हणजे यात कुठलीही नक्कल केलेली नसते व प्रत्यक्षात सर्वोच्च प्रतीच्या साहसाचेच चित्रण चित्रपट रूपात दाखविले जाते, त्यामुळे प्रेक्षकांना जगातल्या सर्वात अनोख्या व दर्जेदार साहसाजी मेजवानी मोठ्या पडद्यावर उत्तम ध्वनीव्यवस्थे सोबत अनूभवायला मिळते.
महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या गिर्यारोहण संस्थांमध्ये आपली ओळख निर्माण करणार्या वैनतेय गिर्यारोहण संस्थेने सुरूवातीपासूनच अशा
प्रकारचे नाविन्यपूर्ण गिर्यारोहण, साहस, निसर्ग, इतिहास आदी विषयाच्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. दादासाहेब फाळके यांच्या
रूपात नासिक मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीचा शुभारंभ झाला त्या देशाच्या चित्रपट नगरीत बांफ सारखा चित्रपट महोत्सव रूजवून
नासिकमध्ये डोंगरसंस्कृती वृद्धींगत करण्यासाठी वैनतेय प्रयत्नशील असून या सुट्टीत चुकवू नये अशा स्वरूपाच्या या भव्य दिव्य
सोहळ्यासाठी नासिक नगरी सज्ज झाली आहे. यासाठी वैनतेयच्या शिलेदारांसह नासिकच्या विविध गिर्यारोहण, पर्यावरण, सायकल,
मॅरेथॉन, आदी खेळाच्या संस्थांचे सहकार्य लाभत आहे.
या चित्रपट महोत्सवाच्या प्रवेशिका ऑनलाईन उपलब्ध असून ज्यांना प्रत्यक्षातली तिकीटे हवी आहेत त्यांनी ती साई स्पोर्ट्स, कॅनडा कॉर्नर,
कार्वी रिसोर्स लायब्ररी, नासिकरोड किंवा टकले बंधू सराफ, सराफ बाजार, नासिक येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी राहूल सोनवणे -93739 00219, प्रशांत परदेशी -90 11 703 703 यांच्याशी संपर्क साधावा.
बांफ चित्रपट महोत्सव
आयोजक: वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्था, नासिक
सह आयोजक: द हिमालयन क्लब, मुंबई
दिनांक: *५ मे २०२३*
वेळ: *सायंकाळी ५-३० ते ८-३०*
ठिकाण: *रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रस्ता, नासिक
Nashik Banff Mountain Film Festival