नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एटीएम फोडणा-या गँगचा पर्दाफाश करत पोलिसांनी विरेंद्र फुलकरण चौधरी (३३),धर्मेद्र उर्फ राहूल रामनारायण पाल (३३) व अमरकुमार रामदयाल चौधरी (२८ मुळ रा.सर्व उत्तरप्रदेश हल्ली तेजस अपा.म्हसरूळ) यांना अटक केली असून अनिल उर्फ ध्रुपकरण चौधरी या म्होरक्यास मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जेलमधून सुटलेल्या एकाचा पोलिस वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याने या घटनेचा भांडाफोड झाला आहे. मृताच्या मोबाईलच्या आधारे हे त्रिकुट पोलिसांच्या हाती लागले आहे.
या संशयितांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तूलसह,जिवंत काडतुसे आणि कोयता हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना गुरूवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गॅगने राज्यासह परराज्यात अनेक गुन्हे केलेली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे आरोपी म्हसरूळ येथील तेजस अपार्टमेंट येथे भाडे तत्वावर राहत होते. म्होरक्या अनिल चौधरी आपली चारचाकी काढून पसार झाला.
मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात असलेला म्होरक्या अनिल चौधरी व विरेंद्रकुमार चौधरी हे दोघे गेल्या पंधरवाड्यापूर्वी नाशकात दाखल झाले होते. स्क्रप व्यावसायीक असल्याचे सांगून त्यांनी म्हसरूळ येथील तेजस अपार्टमेंट या सोसायटीतील फ्लॅट भाडेतत्वावर घेतला होता. नाशिक मुक्कामात संशयितांनी म्हसरूळ सह मखमलाबाद शिवारातील एटीएम बुथची रेकी केली. त्यानंतर उर्वरीत तिघांनी नाशकात येवून हे कृत्य केले. बुथमध्ये पैसे काढण्यामागे न लागता थेट एटीएम मशिन पळविणारी ही टोळी असून, त्यासाठी त्यांनी कार खरेदी केल्याचे बोलले जाते. वाहनात उचलून घेवून जात निर्जनस्थळी ही टोळी कटरच्या माध्यमातून एटीएम मशिन कापून पैसे काढत असल्याचे तपासात पुढे आले आहे.