नीट परीक्षेत नाशिकचा आशिष भराडीया दिव्यांगांमध्ये देशात प्रथम
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल काल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत आशिष भराडीया हा विद्यार्थी दिव्यांगामध्ये देशात प्रथम आला आहे.तर जनरल कॅटेगिरीमध्ये देशात त्याचा ७२२ रँक आला आहे. या यशाचे नाशिकसह जिल्हाभरात कौतुक होत आहे. कठोर परिश्रम केले तर शारीरिक त्रास किंवा संकटावर देखील देखील मात करता येते, असेच यातून दिसते. विशेष म्हणजे, आशिषचा मोठा भाऊ विश्वेश हा काही वर्षांपूर्वी नीट परिक्षेत देशामध्ये ५१वा आला होता. त्यामुळे सध्या दोन्ही भराडिया भावांची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे.
दिव्यांगावर मात
देशभरात मागील महिन्यात घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत आशिष भराडीया हा विद्यार्थी अपंगांमध्ये देशात प्रथम आला. आशिष हा नाशिक येथील प्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद भराडीया आणि डॉ. वैशाली भराडीया यांचा मुलगा आहे. नीट परीक्षेला यावर्षी देशभरातून २१ लाख विद्यार्थी बसले होते. देशातील ४९९ शहरांमध्ये व परदेशातील १४ शहरांमध्ये ही परिक्षा घेण्यात आली १३ भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. यात आशिष देखील दिव्यांग कॅटेगीरीतुन परीक्षेला बसलेला होता. या परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेत होता. त्याच जोरावर हे दैदिप्यमान यश मिळवले. प्रथम आलेला आशिष भराडीया लहान असताना ऐकण्यास येत नव्हते, त्यामुळे त्याच्या कानावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यानंतर त्याने आपल्या अभ्यासात सातत्य ठेवत, दिव्यांगावर मात करत देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.
सातत्यपूर्ण अभ्यास
आशिषचे प्राथमिक शालेय शिक्षण नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल स्कुलमध्ये झाले आहे. बारावीच्या परीक्षेत त्याला ८५ टक्के गुण मिळाले आहेत. तर नीट परीक्षेत त्याला ७२० पैकी ६९० गुण मिळाले आहेत. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी आशिषने सांगितले की, मला चांगले मित्र, चांगले शिक्षक आणि काळजी घेणारे कुटुंब मिळाले. आशिष त्याचा मोठा भाऊ विश्वेशला आपला आदर्श मानतो. विश्वेश भारतातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालय AIIMS दिल्ली येथून वैद्यकीय शिक्षण घेत आहे. देशभरातून नीट परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात. त्यासाठी प्रचंड मेहनत देखील विद्यार्थ्यांकडून केली जाते. आशिषने देखील नीट परिक्षेच्या तयारीसाठी प्रचंड मेहनत घेतली. त्याचबरोबर आशिषने खासगी क्लास लावला होता. तो दररोज किमान आठ तास अभ्यास करत होता. सातत्यपूर्ण अभ्यासामुळेच हे यश मिळाले असल्याची भावना आशिषने व्यक्त केली.
विश्वेशही प्रचंड हुशार
विशेष म्हणजे आशिषचा भाऊ विश्वेश भराडीया यानेही यापूर्वी अशाच प्रवेश परीक्षेत लक्षणीय यश मिळवत देशात ५१ वा क्रमांक पटकावला होता. त्यामुळेच त्याला दिल्लीतील एम्स कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्याने त्याचे एमबीबीएसचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या भेटीच्या कार्यक्रमात विश्वेश याला मोठी जबाबदारी देण्यात आली होती. तसेच, परदेशात जाण्याची संधीही विश्वेशला मिळाली होती.