नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील उपनगर-नाशिकरोड परिसरात असलेल्या आर्टिलरी सेंटरवर ड्रोनने घिरट्या घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्टिलरी सेंटर हे संरक्षण दलाच्या अखत्यारित येते. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र आहे. याठिकाणी ड्रोनच्या वापरास परवानगी नाही. मात्र, गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका ड्रोनने काही मिनिटांसाठी आर्टिलरी सेंटरवर घिरट्या घातल्या आहेत. याची गंभीर दखल संरक्षण दलाने घेतली आहे. याप्रकरणी आता उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात ड्रोनने आर्टिलरी सेंटरच्या परिसरात घिरट्या घातल्या. काही मिनिटे हा ड्रोन दिसत असल्याने संरक्षण यंत्रणांनी त्याची तत्काळ दखल घेतली. हा ड्रोन पाडण्यासाठी यंत्रणांनी तयारी केली. तेवढ्यात हा ड्रोन आकाशातून गायब झाला. त्यानंतरही यंत्रणांनी परिसरात बरीच शोधाशोध केली. मात्र, त्यांना अपयश आले. अखेर संरक्षण यंत्रणांनी उपनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्याची दखल घेत पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आर्टिलरी सेंटर लगतच्या परिसरात काही खासगी कार्यक्रम होता का, तेथे ड्रोनचा वापर झाला का, यासह विविध बाबींची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी एका पथकाची नियुक्ती केली आहे. त्याद्वारे कसून शोध सुरू आहे.
असे आहे आर्टिलरी सेंटर
भारतीय लष्कराच्या अखत्यारित आर्टिलरी सेंटर येते. याठिकाणी लष्कराला आवश्यक असलेल्या तोफांचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. देशातील हे अतिशय महत्त्वाचे केंद्र आहे. तसेच, या केंद्रालगत कम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग (कॅट) ही संस्था सुद्धा आहे. या संस्थेमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाते. त्यामुळे हा संपूर्ण परिसर अतिशय संवेदनशील आहे. या परिसरात परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश मिळत नाही. तसेच, या परिसरात ड्रोनच्या उड्डाणासही मनाई आहे. अशा स्थितीत ड्रोन नेमका कुठून आला, कुठे गेला, कुणाचा होता, या ड्रोनद्वारे सेंटर आणि परिसराची रेकी करण्यात आली का, दहशतवाद्यांशी त्याचे काही कनेक्शन आहे का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. संरक्षण गुप्तहेर खाते आणि पोलिस यांच्यावतीने सध्या याचा तपास सुरू आहे.
Nashik Artillery Center Drone Spy Crime Alert
Defence Upnagar Police Station Complaint FIR Illegal