नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल १८०० कोटी रुपयांची उलाढाल असलेली आणि राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितींपैकी एक असलेल्या नाशिक बाजार समितीचा अखेर निकाल लागला आहे. माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वातील आपलं पॅनलने सत्ता मिळवली आहे. आपलं पॅनलचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. तर, माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. तसेच, या निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या. खासकरुन मतदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेण्यात आले. तेथून थेट मतदान केंद्रावर आणण्यात आले. राज्यात प्रथमच असा प्रयोग झाला. त्यामुळे ही बाब राज्यभरातच चर्चेची ठरली. मात्र, एवढा फाईव्ह स्टार खटाटोप करुनही शेतकरी विकास पॅनलची सत्ता आलेली नाही.
चुंभळे आणि पिंगळे यांनी जोरदार प्रचार केला. तसेच, इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना धमकी दिल्या प्रकरणी चुंभळे पितापुत्रांवर गुन्हाही दाखल झाला. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकजूट दाखविली आणि त्यांना यश आले आहे. आपलं पॅनलच्या ३ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. आजच्या निकालात पिंगळेंच्या नेतृत्वातील पॅनलने ९ जागा जिंकल्या तर विरोधी शेतकरी विकास पॅनलला ६ जागा मिळाल्या.
विजयी उमेदवार असे
भास्कर गावित, निर्मला कड, विनायक मळेकर, जगन्नाथ कटाळे, सविता तुंगार, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, कल्पना चुंबळे, युवराज कोठुळे, उत्तम खांडबहाले, देविदास पिंगळे, संपतराव सकाळे.
सोसायटी सर्वसाधारण गटात तानाजी करंजकर, शिवाजी चुंभळे, राजाराम धनवटे.
Nashik APMC Election Result Declared