नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडून आलेल्या अमृता वसंत पवार यांनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दरमहा होणाऱ्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी बैठकीचे मानधन दिले जाते. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक म्हणून हे मासिक मानधन मी नम्रपणे नाकारते आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.
पवार यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांची, सर्व मतदारांची प्रतिनिधी म्हणून मी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून माझी जबाबदारी पार पाडत आहे. शेतकऱ्यांसह सर्व मतदार बांधवांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला संचालक म्हणून निवडून दिले आहे. निर्वाचित प्रतिनिधी म्हणून बाजार समितीच्या बैठकीला उपस्थित राहणे हे माझे कर्तव्य आहे. यामुळे निव्वळ मासिक बैठक भत्ता घेण्याची माझी इच्छा नाही. याबाबत हे मासिक बैठक अनुदान मला देण्यात येऊ नये, असे पत्र मी माननीय सभापती महोदयांना दिले आहे. ही रक्कम शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये वापरण्यात यावी. माझ्या या मागणीचा नक्कीच गांभीर्याने विचार केला जाईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अशाच प्रकारे जिल्ह्यातील विविध बाजार समितींमध्ये निवडून आलेले संचालकही निर्णय घेणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.