नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटनास चालना मिळावी यासाठी त्रंबकेश्वर तालुक्यात अंजनेरी-ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्प व्हावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.प्राथमिक अहवाल व सर्व प्रकारची व्यवहार्यता तसेच डीपीआरचे काम पूर्ण झाल्यानंतर आता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीने प्रस्तावित अंजनेरी -ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.रोपवेच्या कामाविषयीची निविदा कंपनीने ३१ जुलैपर्यंत मागविल्या असून आता लवकरच रोपवे प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणारा असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.
अंजनेरी हे रामभक्त हनुमान यांची जन्मस्थान असून ब्रह्मगिरी पर्वतावर शिव शंकरांनी जटा आपटल्या आहेत.यामुळे अंजनेरी आणि ब्रह्मगिरी हे पवित्र धार्मिक स्थळे आहेत.असे असले तरी अंजनेरी आणि ब्रह्मगिरी हे दोन्ही पर्वत अति उंच असल्याने मनात असूनही भाविक आणि पर्यटक त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत.भाविकांना अंजनेरी आणि ब्रम्हगिरीवर जाणे सोपे व्हावे यासाठी अंजनेरी -ब्रह्मगिरी या धार्मिक पर्वतांना जोडणारा रोपवे उभारण्यात यावा यासाठीची मागणी हजारो भाविक आणि पर्यटकांकडून खा.गोडसे यांच्याकडे सतत होत होती.
पर्यकांच्या भावना लक्षात घेऊन अंजनेरी -ब्रह्मगिरी या दरम्यान रोपवे प्रकल्प उभारण्यासाठी खा.गोडसे काही वर्षांपासून प्रयत्नशील होते. दरम्यानच्या काळात राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीचे प्रकाशगौर,प्रशांत जैन,एन.सी.श्रीवास्तव यांनी अंजनेरी,ब्रम्हगिरी पाहणी केली होती.यावेळी या ठिकाणी रोपवे होणे किती गरजेचे आहे हे खा.गोडसे यांनी अधिकाऱ्यांना पटवून दिले होते.खा.गोडसे यांनी दिल्ली दरबारी सतत पाठपुरावा करून प्रस्तावित अंजनेरी -ब्रम्हगिरी रोपवे विषयीच्या सर्व व्यवहार्यता यशस्वीपणे तपासून घेतल्या होत्या.प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम लवकरात लवकर सुरू करण्याकामी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करावी यासाठी खा. गोडसे यांचा केंद्राकडे सततचा पाठपुरावा सुरू होता.
खा.गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले असून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीने अंजनेरी -ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.निविदा प्रक्रियेची अंतिम तारिख ३१ जुलैपर्यत असणार आहे.अंजनेरी -ब्रम्हगिरी रोपवे प्रकल्पाचा मुख्य कंट्रोल रूम मध्यवर्ती पेगलवाडी येथे असणार आहे.रोपवेची लांबी ५.७ किलोमिटर असणार असून या प्रकल्पावर होणारा खर्च सुमारे पावणे चारशे कोटी रुपये होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.